१० लाखांहून अधिक रोकड बाळगण्यास बंदी येणार?
By Admin | Updated: January 20, 2015 02:31 IST2015-01-20T02:31:50+5:302015-01-20T02:31:50+5:30
प्रवासात सोबत नेण्याच्या रकमेवर १० लाख रुपयांची कमाल मर्यादा घालण्याचा प्राप्तिकर विभागाचा प्रस्ताव असून आगामी केंद्रीय अर्थसंकल्पात तशी तरतूद केली जाण्याची शक्यता आहे.

१० लाखांहून अधिक रोकड बाळगण्यास बंदी येणार?
नवी दिल्ली : देशातील काळ्या पैशाला आवर घालण्याचा एक उपाय म्हणून कोणाही व्यक्तीने रोकड स्वरूपात जवळ बाळगण्याच्या किंवा प्रवासात सोबत नेण्याच्या रकमेवर १० लाख रुपयांची कमाल मर्यादा घालण्याचा प्राप्तिकर विभागाचा प्रस्ताव असून आगामी केंद्रीय अर्थसंकल्पात तशी तरतूद केली जाण्याची शक्यता आहे.
प्राप्तिकर विभागातील उच्चपदस्थ सूत्रांनी सांगितले की, मोठ्या रकमेच्या खरेदी व्यवहारांमध्ये खरेदीदार आणि विक्रेता या दोघांनीही आपापले ‘पॅन नंबर’ नमूद करणेही सक्तीचे केले जाण्याची शक्यता आहे. सूत्रांनुसार यासाठी एक लाख रुपयांची मर्यादा ठरविली जाऊ शकेल.
सूत्रांनी असेही सांगितले की, जवळ बाळगायच्या रोकड रकमेवर अशी कमाल मर्यादा घातल्यानंतर त्याहून अधिक रोकड ज्याच्याकडे आढळून येईल त्याला जबर दंड आकारणी करण्याचाही प्रस्ताव असून हा दंड किती असावा याचे नियम तयार केले जात आहेत. सध्या कोणाही व्यक्तीने किती रोकड एका वेळी जवळ बाळगावी यावर कोणतेही कायदेशीर बंधन नाही. एक लाख रुपये किंवा त्याहून अधिक रकमेच्या खरेदी व्यवहारासाठी ‘पॅन नंबर’ सक्तीचा करावा, असाही केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाचा प्रस्ताव आहे. खरेदीदाराकडे ‘पॅन’ नसेल तर ‘आधार’सह अन्य सरकारमान्य ओळख दस्तावेज देणे त्याला सक्तीचे असेल. विके्रत्यालाही ‘पॅन नंबर’ लागेल.
४गेल्या लोकसभा निवडणुकीत काळा पैसा हा कळीचा मुद्दा होता व काळ्या पैशाविरुद्ध खंबीर पावले उचलण्याच्या आश्वासनावर लोकांनी भाजपच्या हाती सत्ता दिली आहे.
४अर्थात त्या चर्चेचा मुख्य रोख भारतीयांनी परदेशात दडवून ठेवलेल्या काळ्या पैशाकडे होता.
४तो काळा पैसा हुडकून देशात परत आणण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने विशेष तपासी पथकही (एसआयटी) नेमले आहे.
४असे असले तरी देशातील काळा पैसा हाही तेवढाच डोकेदुखीचा विषय आहे व त्याला लगाम घालणेही गरजेचे आहे, यावर तज्ज्ञांचे एकमत दिसते.