अल्पसंख्याकांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा

By Admin | Updated: March 21, 2015 00:02 IST2015-03-20T22:40:14+5:302015-03-21T00:02:55+5:30

मुस्लिमांचे पाच टक्के आरक्षण, अन्नसुरक्षा कायद्याची अंमलबजावणी, गोवंश हत्त्याबंदी कायदा शिथिल करण्याची मागणी

Morcha of the minority district's office | अल्पसंख्याकांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा

अल्पसंख्याकांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा

मुस्लिमांचे पाच टक्के आरक्षण, अन्नसुरक्षा कायद्याची अंमलबजावणी, गोवंश हत्त्याबंदी कायदा शिथिल करण्याची मागणी
नाशिक : अल्पसंख्याक मुस्लीम समाजाला शिक्षण, नोकरी, व्यवसायासाठी सरकारने दिलेले पाच टक्के आरक्षण कायम ठेवावे, राष्ट्रीय अन्नसुरक्षा कायद्याची प्रभावी अंमलबजावणी, गोवंश हत्त्याबंदी कायद्यात शिथिलता तसेच कुरेशी समाजास नोकरीत आरक्षण देण्याच्या मागणीसाठी नाशिक जिल्हा (शहर) काँग्रेस कमिटी अल्पसंख्याक विभागाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला़ यावेळी प्रचंड घोषणाबाजी करून जिल्हाधिकार्‍यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले़
अल्पसंख्याक मुस्लीम समाजास देण्यात आलेले पाच टक्के आरक्षण रद्द करण्यात आल्याने अशिक्षित असलेला हा समाज प्रवाहातून दूर फेकला जाईल, यामुळे हे आरक्षण पुन्हा लागू करावे़ आघाडी सरकारच्या राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेपासून गोर-गरिबांना दूर ठेवण्यात आले असून, त्याची प्रभावी अंमलबजावणी करावी़ तसेच महाराष्ट्र सरकारने गो-वंश हत्त्या बंदीचा कायदा लागू केल्यानेे बीफ व्यावसायिकांसह चामडी उद्योग बंद पडणार आहेत़ त्यामुळे या कायद्यात शिथिलता आणून शेतकर्‍यांकडील भाकड जनावरे विक्री करण्याची अनुमती द्यावी, या मागण्या यावेळी करण्यात आल्या़
या मोर्चात अल्पसंख्याक उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष ईशाद जहाँगिरदार, अल्पसंख्याक शहराध्यक्ष हनिफ बशीर यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते़ (प्रतिनिधी)

--इन्फो--
भाजपाची गोमांस विक्री पत्रकांचे वाटप
भाजपा सरकारने राज्यात नुकताच गोवंश हत्त्याबंदीचा कायदा लागू केला़ मात्र गोव्यातील भाजपा सरकार गोव्यातील जनतेच्या ताटात फ्रेश गोमांस वाटत असल्याची बातमी प्रकाशित झालेली पत्रके या मोर्चात वाटण्यात आली़ गोवा सरकार कर्नाटक व महाराष्ट्रातून मांस खरेदी करीत असून, त्यासाठी प्रायव्हेट कोल्ड स्टोअरची मदत घेतली जात असल्याचे या बातमीत म्हटले आहे़

फोटो :- २० पीएचएमआर १११
नाशिक जिल्हा (शहर) काँग्रेस कमिटी अल्पसंख्याक विभागाच्या वतीने विविध मागण्यांसाठी शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला़ यावेळी घोषणाबाजी करताना अल्पसंख्याक विभागाचे पदाधिकारी व कार्यकर्ते़

Web Title: Morcha of the minority district's office

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.