उत्तर प्रदेशातील मुरादाबादमधील भोजपूर पोलीस स्टेशन परिसरात एक धक्कादायक घटना घडली आहे. रस्त्यावरून जाणाऱ्या २५ वर्षीय तरुणाचा अचानक मृत्यू झाला. ही घटना रस्त्यावरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाली आहे. दुपारी घरी जेवल्यानंतर दुकानात जात असताना २५ वर्षीय रेहान कुरेशीचा मृत्यू झाला.
रेहान कुरेशी नेहमीप्रमाणे जेवण करून दुकानात जाण्यासाठी घराबाहेर पडला होता. काही पावलं चालल्यानंतर तो अचानक रस्त्यावर खाली पडल्याचं सीसीटीव्हीमध्ये पाहायला मिळत आहे. तो खाली पडल्यावर आजूबाजूचे लोक मदतीसाठी पुढे आले.
कुटुंबातील सदस्य घटनास्थळी पोहोचले आणि त्याला ताबडतोब उपचारासाठी जवळच्या क्लिनिकमध्ये नेण्यात आलं, जिथून त्याला दुसरीकडे रेफर करण्यात आलं. मात्र जिल्हा मुख्यालयात पोहोचण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला. मृत्यूचे नेमकं कारण अद्याप समोर आलेलं नाही.
रेहान कुरेशी हा एका मोबाईच्या दुकानात काम करायचा. सात महिन्यांपूर्वीच उत्तराखंडमधील रामनगर येथील एका मुलीशी तरुणाचं लग्न झालं होतं. रेहानचा अचानक अशा प्रकारे मृत्यू झाल्याने सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे.