ठरलं! २० जुलैपासून संसदेचे पावसाळी अधिवेशन; नव्या संसद भवनात होणार कामकाज
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 1, 2023 15:42 IST2023-07-01T15:41:48+5:302023-07-01T15:42:31+5:30
Monsoon Session of Parliament 2023: यंदाच्या पावसाळी अधिवेशनाचे वैशिष्ट्य म्हणजे हे सत्र नवीन संसद भवनात होणार आहे.

ठरलं! २० जुलैपासून संसदेचे पावसाळी अधिवेशन; नव्या संसद भवनात होणार कामकाज
Monsoon Session of Parliament 2023: एकीकडे पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीची तयारी सर्वपक्षीयांकडून सुरू झाली आहे. भाजपविरोधात विरोधकांची फळी उभी करण्यासाठी प्रयत्न सुरू झाले आहेत. यातच आता संसदेचे पावसाळी अधिवेशन कधी असेल, याबाबत संसदीय कार्यमंत्री प्रल्हाद जोशी यांनी माहिती दिली. संसदेचे पावसाळी अधिवेशन अनेकविध मुद्द्यांवरून चांगलेच गाजेल, अशी चर्चा आहे. विशेष म्हणजे पावसाळी अधिवेशन नव्या संसद भवनात होणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.
२०२३चे संसदेचे मान्सून सत्र २० जुलैपासून सुरु होईल आणि ते ११ ऑगस्टपर्यंत चालेल. २३ दिवस चालणाऱ्या या सत्रात एकूण १७ बैठका होतील. त्यासाठी मी सर्व राजकीय पक्षांना संसदेच्या कायदेविषयक आणि अन्य कामकाजामध्ये सहभागी होण्याची विनंती करतो, असे आवाहन प्रल्हाद जोशी यांनी केले. २० जुलैपासून सुरू होत असलेल्या यंदाच्या पावसाळी अधिवेशनाचे वैशिष्ट्य म्हणजे हे सत्र नवीन संसद भवनात होणार आहे.
समान नागरी कायद्याचे विधेयक मांडले जाण्याची शक्यता
संसदेच्या या सत्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी समान नागरी कायद्याचे विधेयक देखीस याच अधिवेशनात आणण्याची शक्यता आहे. पावसाळी अधिवेशनातच समान नागरी कायद्याचे विधेयक सभागृहात मांडले गेले तर यावर असलेल्या राजकीय पक्षांच्या वेगवेगळ्या भूमिकांमुळे यावरून जोरदार गदारोळ होऊ शकतो, असे म्हटले जात आहे.
दरम्यान, दिल्लीतील केंद्र आणि राज्य यांच्यातील संघर्षाचे पडसाद या अधिवेशनात पाहायला मिळण्याची शक्यता आहे. अधिकाऱ्यांच्या ट्रान्सफर पोस्टिंगच्या प्रकरणी नायाब उपराज्यपाल यांना अधिकार देण्याच्या विधेयक संसदेतील घमासानाचे कारण ठरू शकते. या दोन मुद्द्यांवर हे अधिवेशन चांगलेच तापण्याची शक्यता आहे.