मोहाली MMS कांड: वॉशरूमला जायलाही घाबरत आहेत मुली, पोलीस शोधणार छुपे कॅमेरे
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 19, 2022 14:32 IST2022-09-19T14:31:09+5:302022-09-19T14:32:29+5:30
चंदिगड विद्यापीठात शिकणाऱ्या 60 हून अधिक तरुणींचे अंघोळ करतानाचे MMS लीक झाल्यानंतर मोठी खळबळ उडाली आहे.

मोहाली MMS कांड: वॉशरूमला जायलाही घाबरत आहेत मुली, पोलीस शोधणार छुपे कॅमेरे
चंदिगड: चंदिगड विद्यापीठात शिकणाऱ्या एका तरुणीने 60 हून अधिक तरुणींचे अंघोळ करतानाचे MMS लीक केल्यानंतर मोठी खळबळ उडाली आहे. हे MMS कांड उघडकीस आल्यानंतर आता विद्यार्थिनी युनिव्हर्सिटी कॅम्पसमधील वॉशरूम वापरण्यासही घाबरत आहेत. तसेच, अनेकजणी आपापल्या घरी परतत आहेत. आरोपी तरुणीने इतर तरुणींचे व्हिडीओ बनवून तिच्या प्रियकराला पाठवले. यातील काही व्हिडीओ सोशल मीडिया आणि पॉर्न वेबसाइटवर अपलोड करण्यात आल्याचा आरोप केला जात आहे.
पोलिसांनी आरोप फेटाळले
दरम्यान, पोलिसांनी हे आरोप फेटाळून लावले असून, मुलीने फक्त तिचाच व्हिडिओ बनवून प्रियकरासोबत शेअर केल्याचे म्हटले आहे. आरोपी तरुणीच्या मोबाईलमधून इतर कोणत्याही विद्यार्थ्यींनीचा व्हिडीओ सापडला नसल्याचे पोलिसांनी सांगितले. पोलिसांनी सांगितल्यानुसार, चुकीची माहिती कॅम्पसमध्ये पसरल्यामुळे सर्व विद्यार्थी घाबरले आणि विरोध केला.
पोलीस छुपे कॅमेरे शोधणार
गेल्या दोन दिवसांपासून विद्यापीठात तरुणींचे आंदोलन सुरू आहे. आंदोलनादरम्यान काही विद्यार्थिनींनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, आता त्यांना कॅम्पसमधील वॉशरूम वापरण्याचीही भीती वाटत आहे. यादरम्यान पोलीस वसतिगृहातील छुपे कॅमेरे शोधत आहेत. दरम्यान, अनेक विद्यार्थ्यांनी, पोलिस खोटं बोलत असल्याचे म्हटले आहे. त्या विद्यार्थिनीने फक्त स्वतःचा व्हिडीओ बनवून पाठवला असेल तर तिला लॉकअपमध्ये का टाकले ? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
वॉर्डनमुळे वेळेवर कारवाई होत नाही
आंदोलक विद्यार्थ्यानी वसतिगृहाच्या वॉर्डनवरही टीका केली. 'प्रॉब्लेम तुमच्या कपड्यांमध्ये आहे, व्हिडिओ नाही. तुमच्या कपड्यांमुळे मुले अश्लील व्हिडिओ बनवतात', अशाप्रकारचे वक्तव्य करणाऱ्या वॉर्डनविरोधात विद्यार्थी आक्रमक आहेत. वॉर्डनमुळे मुलींच्या वसतिगृहातील समस्या विद्यापीठ प्रशासनापर्यंत पोहोचल्या नाहीत, असा विद्यार्थ्यांचा आरोप आहे. यावर विद्यापीठ प्रशासनाने पोलिसात एफआयआर नोंदवल्याचे सांगितले.