पुन्हा मोदी की सत्तापालट?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2019 06:30 AM2019-05-23T06:30:50+5:302019-05-23T06:35:40+5:30

इव्हीएम वाद चिघळला; आधी मतमोजणी मग पडताळणी

Modi's regime again? | पुन्हा मोदी की सत्तापालट?

पुन्हा मोदी की सत्तापालट?

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क । नवी दिल्ली : एक्झिट पोल्सचे कवित्व संपून उद्या, गुरुवारी सकाळी मतमोजणीला सुरुवात होणार असून, नेत्यांच्या हृदयाची धडधड वाढली आहे. देशात मोदी लाट कायम आहे की देशाच्या सत्तेचा सारीपाट पालटणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मतमोजणीआधी इव्हीएममधील मतांची व्हीव्हीपॅट पडताळणी करण्याची मागणी निवडणूक आयोगाने अमान्य केली. त्यामुळे इव्हीएममधील मोजणी पूर्ण झाल्यानंतरच व्हीव्हीपॅट पडताळणी केली जाईल.

कौल भाजपच्या बाजूने असल्यास शक्यता काय ?
सर्व एक्झिट पोलप्रमाणे भाजपला बहुमत मिळाल्यास पुन्हा मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजप व मित्रपक्षांचे (एनडीए) सरकार येईल. पण एनडीएचे संख्याबळ २३०च्या आत राहिले तर सत्ता एनडीएची; पण पंतप्रधानपदी मोदींखेरीज अन्य कोणी, अशी मागणी भाजपचे मित्रपक्ष धरू शकतील. अशा वेळी कोण असेल ती व्यक्ती?


हिंसाचाराची भीती
निकाल लागल्यावर अनेक भागांत हिंसाचाराची शक्यता लक्षात घेत केंद्रीय गृहमंत्रालयाने सर्व राज्यांना सावध केले आहे. सर्व राज्यांच्या मुख्य सचिवांना व पोलीस महासंचालकांना कळवले आहे की, कायदा-सुव्यवस्था बिघडू नये, यासाठी सुरक्षा व बंदोबस्ताची पावले उचलावीत. उत्तर प्रदेश, बिहार, बंगाल व त्रिपुरामध्ये काही संघटना व व्यक्तींची वक्तव्ये पाहता मतमोजणीत व्यत्यय व हिंसाचाराची शक्यता व्यक्त होत आहे.

एनडीएच्या बाजूने कोण?
भाजपच्या मित्रपक्षांची संख्या आहे ३६. त्यात शिवसेना, अकाली, अण्णा द्रमुक, जेडीयू तसेच ईशान्येकडील मित्रपक्षांची आघाडी, अपना दल, लोजशपा असे अनेक आहेत.
शिवसेना : शिवसेनेचे खासदार वाढणार की कमी होणार? ते वाढल्यास शिवसेना सत्तेत अधिक वाटा मागू शकेल. भाजपला बहुमत न मिळाल्यास शिवसेना पुन्हा एकवार अधिक आक्रमक व आग्रही होऊ शकेल.
जेडीयू : आतापर्यंत केंद्रात जेडीयूचा एकही मंत्री नव्हता. पण आता त्या पक्षाला केंद्रात वाटा द्यावाच लागेल. त्यांचे मंत्री वाढल्यास भाजपला स्वत:चे मंत्री कमी करावे लागतील. शिवाय अण्णा द्रमुकलाही काही मंत्रिपदे द्यावी लागतील.यूपीएच्या बाजूने कोण?
द्रमुक, जेडीएस, राजद, टीडीपी, राष्ट्रवादी हे पक्ष यूपीएमध्ये आहेत. पण यूपीएला सर्वाधिक जागा मिळाल्या तरी सप-बसप, तृणमूल यांचीच अधिक मदत लागेल.
राष्टÑवादी : केंद्रात काँग्रेस प्रणीत यूपीएचे सरकार आल्यास शरद पवार यांचे महत्त्व वाढेल. पण रालोआचे सरकार आल्यास शरद पवार व राष्ट्रवादी यांचे महत्त्व कमी होईल. सहा महिन्यांत होणाऱ्या विधानसभा निवडणुकांकडे त्यांचे लक्ष लागले आहे.
टीडीपी : भाजपविरोधी आघाडीसाठी चंद्राबाबू नायडूच अधिक धावपळ करीत आहेत. पण त्यांच्या प्रयत्नांना यश येईल का? केंद्रात भाजपविरोधी सरकार येईल का? तसेच आंध्र प्रदेश विधानसभेत त्यांच्या पक्षाला बहुमत मिळून ते पुन्हा मुख्यमंत्री होणार का?
टीआरएस टीआरएसचे प्रमुख चंद्रशेखर राव बिगरभाजप, बिगरकाँग्रेसी प्रादेशिक पक्षांच्या आघाडीचा प्रयत्न करीत आहेत. पण रालोआ वा यूपीए यांना बहुमत मिळाल्यास टीआरएसचे महत्त्व कमी होऊ शकेल.
तृणमूल : ममता बॅनर्जी यांच्यासाठी ही प्रतिष्ठेची लढाई आहे. त्यांना फारच कमी जागा मिळाल्यास प. बंगाल सरकार बरखास्तीची मागणी भाजपच करू शकेल. पण यूपीएचे सरकार आले तर बहुमतासाठी तृणमूलची गरज नक्कीच भासेल.
सप+बसप : मतविभाजन टाळून भाजपला धूळ चारण्यासाठीच सप व बसपने आघाडी केली आहे. त्याचा फायदा झाला व काँग्रेसला एक्झिट पोलपेक्षा अधिक जागा मिळाल्यास दोघांचे महत्त्व वाढेल. पण यूपीत भाजप पुढेच राहिल्यास दोघांत कुरबुरी होतील.

Web Title: Modi's regime again?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.