अमित शहांच्या भाषांतरकाराचा 'घोटाळा'; म्हणाला, 'मोदी देशाचं वाट्टोळं करताहेत'
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 29, 2018 17:01 IST2018-03-29T17:01:46+5:302018-03-29T17:01:46+5:30
कर्नाटकात सिद्धरामय्या सरकारनं लिंगायतांच्या मतांचं धुव्रीकरण करण्यासाठी त्यांना अल्पसंख्याकांच्या दिलेल्या दर्जानं आधीच भाजपाची डोकेदुखी वाढली आहे.

अमित शहांच्या भाषांतरकाराचा 'घोटाळा'; म्हणाला, 'मोदी देशाचं वाट्टोळं करताहेत'
बंगळुरू- कर्नाटकात सिद्धरामय्या सरकारनं लिंगायतांच्या मतांचं धुव्रीकरण करण्यासाठी त्यांना अल्पसंख्याकांच्या दिलेल्या दर्जानं आधीच भाजपाची डोकेदुखी वाढली आहे. परंतु त्यातच भाजपाच्या हिंदीतून कन्नडमध्ये भाषांतर करणा-या व्यक्तीनं अमित शाहांना आणखी अडचणीत आणलं आहे.
गेल्या दोन दिवसांपूर्वीच सिद्धरामय्या सरकारवर टीकेची झोड उठवतानाच चुकून येडियुरप्पा सरकारवर अमित शाहांनी टीका केली होती. भ्रष्टाचारासाठी जर कुठल्या सरकारला बक्षीस द्यायची वेळ आलीच, तर त्यासाठी येडियुरप्पा सरकार पात्र असे, असे अनवधानानं अमित शाह बोलून गेले होते. त्याच प्रमाणे भाजपा खासदार प्रल्हाद जोशी यांनी अमित शाह यांचं भाषण चुकीच्या पद्धतीनं भाषांतरित केलं आहे. येडियुरप्पा आणि मोदी मिळून देशाला प्रगतिपथावर नेतील, असं अमित शाह म्हणाले होते. परंतु भाषांतरकारानं त्याचं काही तरी भलतंच भाषांतर केलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी गरीब, दलित आणि मागास वर्गासाठी काहीही करणार नाहीत. ते देशाला उद्ध्वस्त करतील. तुम्ही त्यांना मतदान करू नका, अमित शाह यांच्या विधानाचं प्रल्हाद जोशी यांनी असं भाषांतर केलं आहे.
उत्तर भारतीय भाजपा नेत्यांना दक्षिण भारतात प्रचार करण्यासाठी अनेकदा भाषेच्या अडचणीचा सामना करावा लागतो. यापूर्वी फेब्रुवारी महिन्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी बंगळुरूमध्ये सभेसाठी आले होते, तेव्हाही त्यांनी हिंदीतून भाषण केलं होतं. तेव्हा ते भाषण अनेक लोकांना समजलंच नव्हतं. कर्नाटकातील लोकांना हिंदी भाषा समजत नसल्यानं ब-याचदा अमित शाह यांचं हिंदीतील भाषण केंद्रीय मंत्री अनंत हेगडे कन्नडमध्ये भाषांतरित करत असतात. तर काही ठिकाणी हे काम प्रल्हाद जोशी करतात. आता त्यांनी सांगितलं की, विधानसभा क्षेत्रातील नेते हिंदीचं कन्नडमध्ये भाषांतर करून देणार आहेत, त्यावेळीच हिंदीतून कन्नडमध्ये ट्रन्सलेशन करण्यासाठी कार्यकर्ते आणि नेते मदत करतील. भाजपा भाषांतरासाठी नेते आणि ट्रान्सलेटर यांची मदत घेत आहेत. त्यामुळेच अशा चुका होत असल्याच स्पष्टीकरण भाजपाकडून देण्यात आलं आहे.