अहमदाबाद: काही दिवसांपूर्वीच कॉंग्रेसमध्ये प्रवेश केलेल्या ओबीसी एकता मंचाचे नेते अल्पेश ठाकोर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींबाबत एक विधान करून नव्या वादाला तोंड फोडलं आहे. मोदी माझ्याप्रमाणे रंगाने काळे होते पण गुजरातचे मुख्यमंत्री झाल्यापासून दरदिवशी तायवान येथील मशरूम खायला सुरूवात केली आणि ते गोरे झाले असं विधान मंगळवारी गुजरात निवडणूक प्रचाराच्या अखेरच्या दिवशी एका रॅलीमध्ये अल्पेश ठाकोरने केलं आहे. मोदी दरदिवसाला 4 लाख रूपयांचे मशरूम खातात त्यामुळे त्यांना गरिबांचं जेवण आवडत नाही असं अल्पेश ठाकोर म्हणाले. 80-80 हजाराचे 5 मशरूम खातात मोदी - अल्पेश''मोदी जे खातात ते तुम्ही खाऊ शकत नाही, कारण ते गरीबांचं जेवण करत नाहीत असं मला कोणीतरी म्हणालं. त्यामुळे ते नेमकं काय खातात असं मी विचारलं तर ते मशरूम खातात असं मला उत्तर मिळालं. पण साधं मशरूम ते खात नाहीत तर त्यांच्यासाठी खास तायवान येथून मशरूम येतं. त्या एका मशरूमची किंमत 80 हजार रूपये आहे, असे 5 मशरूम मोदी दररोज खातात. मुख्यमंत्री बनल्यापासून ते हे मशरूम खात आहेत'' असं उत्तर मला समोरून मिळालं.35 वर्षांपूर्वीचा फोटो पाहिलाय - अल्पेश''मी मोदींचा 35 वर्षांपूर्वीचा फोटो पाहिलाय , ते माझ्याप्रमाणेच रंगाने काळे होते. जो पंतप्रधान दिवसाला 4 लाखांचे मशरूम खातो, म्हणजे महिन्याला 1 कोटी 20 लाखांचे मशरूम खातो त्यांना गरिबांचं जेवण आवडणार नाही...ते केवळ दिखावा करतात''.
मोदी माझ्यासारखे काळे होते पण दिवसाला 4 लाखांचे 'इम्पोर्टेड' मशरूम खाऊन गोरे झाले : अल्पेश ठाकोर
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 13, 2017 17:11 IST