"मोदी, शाह, राजनाथ, नड्डा...!" भाजपचे कार्यकारी अध्यक्ष होताच काय म्हणाले नितीन नवीन?
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 14, 2025 22:32 IST2025-12-14T22:29:36+5:302025-12-14T22:32:11+5:30
नितीन नवीन यांच्या नियुक्तीने बिहार भाजप कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. पाटणा येथील भाजप प्रदेश कार्यालयात कार्यकर्त्यांनी फटाके फोडून आणि ढोल-ताशांच्या गजरात जल्लोष केला.

"मोदी, शाह, राजनाथ, नड्डा...!" भाजपचे कार्यकारी अध्यक्ष होताच काय म्हणाले नितीन नवीन?
बिहारच्या नितीश सरकारमधील मंत्री तथा बांकीपूरचे आमदार नितीन नवीन यांची रविवारी सायंकाळी भारतीय जनता पक्षाचे (भाजप) राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली. या महत्त्वाच्या जबाबदारीनंतर त्यांनी प्रतिक्रिया देत पक्षाचे आभार मानले. राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष म्हणून नियुक्ती झाल्यानंतर, त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि भाजप अध्यक्ष जेपी नड्डा या शीर्ष नेत्यांप्रति कृतज्ञता व्यक्त केली. "पक्षाने आपल्यावर जो विश्वास दाखवला आहे आणि जी जबाबदारी सोपवली आहे, ती आपण पूर्ण निष्ठेने पार पाडू," असे नवीन यांनी म्हटले आहे. ते माध्यमांशी बोलत होते.
फटाके फोडून आणि ढोल-ताशांच्या गजरात जल्लोष -
दरम्यान, नितीन नवीन सोमवारी सकाळी पाटण्याहून दिल्लीसाठी रवाना होण्याची शक्यता आहे. नितीन नवीन यांच्या नियुक्तीने बिहार भाजप कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. पाटणा येथील भाजप प्रदेश कार्यालयात कार्यकर्त्यांनी फटाके फोडून आणि ढोल-ताशांच्या गजरात जल्लोष केला.
कार्यालयात पोहोचताच भव्य स्वागत -
नितीन नवीन प्रदेश कार्यालयात पोहोचताच त्यांचे भव्य स्वागत करण्यात आले. यावेळी भाजपचे प्रदेशाध्यक्ष दिलीप कुमार जयस्वाल, उपमुख्यमंत्री सम्राट चौधरी यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांनी पुष्पहार घालून त्यांचे अभिनंदन केले. नितीन नवीन यांच्या रूपाने बिहारच्या एका नेत्याला राष्ट्रीय कार्यकारिणीत मोठे स्थान मिळाल्याने कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
भाजपचे कार्यकारी अध्यक्ष बनणारे सर्वात तरुण नेते -
नितीन नबीन हे भाजपचे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष बनणारे सर्वात तरुण नेते ठरले आहेत. ते ४५ वर्षांचे आहेत. नितीन नबीन यांना कार्यकारी अध्यक्ष म्हणून मिळालेली नियुक्ती, तेच पुढचे पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष बनणार असल्याची चर्चाही सुरू झाली आहे. नितीन नबीन यांनी पक्षाच्या बांधणीमध्ये प्रत्येक पदावर काम केले आहे. पक्ष बांधण्याचा त्यांना चांगला अनुभव आहे. युवा मोर्चा, सरकारमध्ये मंत्री ते आता राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष असा त्यांचा राजकीय प्रवास झाला आहे. अत्यंत शिस्तप्रिय, रणनीती आणि लोकांशी दांडगा संपर्क असलेला नेता म्हणून त्यांना ओळखले जाते.