पीएम मोदी इटली दौऱ्यावर जाणार? जॉर्जिया मेलोनींच्या निमंत्रणावर 'हे' उत्तर दिले...
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 11, 2025 12:11 IST2025-12-11T12:10:42+5:302025-12-11T12:11:07+5:30
भारत आणि इटली हे एकमेकांसाठी अत्यंत महत्त्वाचे धोरणात्मक भागीदार आहेत.

पीएम मोदी इटली दौऱ्यावर जाणार? जॉर्जिया मेलोनींच्या निमंत्रणावर 'हे' उत्तर दिले...
Narendra Modi-Giorgia Melony:इटलीचे उपपंतप्रधान आणि परराष्ट्र मंत्री अँटोनियो तजानी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत झालेल्या भेटीला अतिशय सकारात्मक ठरवले आहे. भारताच्या तीन दिवसीय दौऱ्यावर असलेले तजानी बुधवार(दि.10) सायंकाळी पीएम मोदींना भेटले. या भेटीदरम्यान त्यांनी इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांच्या वतीने मोदींना पुढच्या वर्षी इटलीला भेट देण्याचे औपचारिक निमंत्रण दिले. पंतप्रधान मोदींनीही या निमंत्रणाला होकार दिल्याचे तजानी यांनी सांगितले.
भेटीत काय चर्चा झाली?
पीएम मोदी आणि इटलीच्या प्रतिनिधीमंडळादरम्यान औद्योगिक सहकार्य, सांस्कृतिक संबंध, व्यापार, तंत्रज्ञान आणि रणनीतिक भागीदारी यावर सविस्तर चर्चा झाली. या भेटीनंतर मीडियाशी संवाद साधताना अँटोनियो तजानी यांनी पंतप्रधान मोदींशी झालेल्या भेटीला अत्यंत सकारात्मक म्हणत, दोन्ही देशांमधील धोरणात्मक भागीदारी अधिक दृढ होत असल्याचे अधोरेखित केले.
भारत-इटली संबंध आता नवीन युगात प्रवेश करत असून, पुढील काही वर्षांत दोन्ही देशांमधील सहकार्य अधिक वेगाने वाढेल. भारत आणि इटली हे एकमेकांसाठी अत्यंत महत्त्वाचे धोरणात्मक भागीदार आहेत. तसेच, जागतिक महत्त्वाच्या प्रश्नांवर, विशेषतः रशिया-युक्रेन संघर्षाच्या संदर्भात भारताची भूमिका निर्णायक ठरू शकते, असे तजानी यांनी स्पष्ट केले. तजानी यांच्या भारत दौर्याने भारत-इटली संबंध एक नवीन टप्प्यात प्रवेश करत असल्याचे स्पष्ट संकेत मिळतात.
द्वीपक्षीय संबंध अधिक मजबूत होणार...
या भेटीमुळे दोन्ही देशातील सहकार्य तंत्रज्ञान, उद्योग, व्यापार, संस्कृती आणि राजनय या क्षेत्रांमध्ये जलद गतीने वाढताना दिसत आहे. विशेष म्हणजे, मोदी-मेलोनी यांच्या मागील काही वर्षांतील भेटी पाहता दोन्ही नेत्यांमध्ये उल्लेखनीय समन्वय आणि सुसंवाद दिसून येतो. एकूणच, भारत-इटली संबंध आर्थिक आणि रणनीतिक दोन्ही पातळ्यांवर आगामी काळात अधिक वेगाने मजबूत होत जाणार, हे या भेटीतून स्पष्ट झाले आहे.
मोदी-मेलोनी यांच्या उल्लेखनीय भेटी:
नोव्हेंबर 2022, बाली (G20): मेलोनी यांची मोदींसोबत पहिली भेट; भारत-इटली संबंधांचा नवीन अध्याय.
2-3 मार्च 2023, नवी दिल्ली: मेलोनींची पहिली अधिकृत भारत यात्रा; रणनीतिक भागीदारीची घोषणा.
सप्टेंबर 2023, नवी दिल्ली (G20): दोन्ही नेत्यांची सहजता आणि जिव्हाळा सोशल मीडियावर चर्चेचा विषय.
14 जून 2024, इटली (G7): मेलोनी यांनी मोदींचे यजमान म्हणून स्वागत; तिसऱ्या कार्यकाळासाठी शुभेच्छा.
18 नोव्हेंबर 2024, रियो (G20): इंडिया-इटली जॉईंट स्ट्रॅटेजिक ॲक्शन प्लॅन 2025-2029 ची घोषणा.
23 नोव्हेंबर 2025, दक्षिण आफ्रिका (G20): दहशतवाद वित्तपुरवठा रोखण्यासाठी संयुक्त उपक्रमाची घोषणा.