मोदींचा गांधी कुटुंबाला अप्रत्यक्ष धक्का?; आता परदेशातही एसपीजी सुरक्षा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 7, 2019 13:55 IST2019-10-07T13:54:11+5:302019-10-07T13:55:56+5:30

राहुल गांधी परदेशात असताना मोदी सरकारकडून एसपीजीच्या नियमांमध्ये बदल

modi government revises security rules for Gandhi family says SPG will accompany them at all times | मोदींचा गांधी कुटुंबाला अप्रत्यक्ष धक्का?; आता परदेशातही एसपीजी सुरक्षा

मोदींचा गांधी कुटुंबाला अप्रत्यक्ष धक्का?; आता परदेशातही एसपीजी सुरक्षा

नवी दिल्ली: मोदी सरकारनं विशेष सुरक्षा दलाच्या (एसपीजी) नियमांमध्ये बदल केले आहेत. यामुळे आता एसपीजीच्या संरक्षणात असलेल्या प्रत्येक व्यक्तीला प्रत्येक ठिकाणी त्यांना सोबत न्यावं लागेल. त्यामुळे आता परदेशात जातानाही एसपीजीचं पथक व्हीव्हीआयपींसोबत असेल. सध्या पंतप्रधान नरेंद्र मोदींसह गांधी कुटुंबातील तीन सदस्यांना एसपीजी सुरक्षा पुरवली जाते. यामध्ये काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी, माजी अध्यक्ष राहुल गांधी आणि महासचिव प्रियांका गांधींचा समावेश असेल.

राहुल गांधी सध्या कंबोडिया दौऱ्यावर आहेत. नेमक्या याचवेळी मोदी सरकारनं एसपीजीशी संबंधित नियमांमध्ये बदल केला. गांधी कुटुंबावर पाळत ठेवण्यासाठीच मोदी सरकारनं हे पाऊल उचलल्याचा आरोप काँग्रेसनं केला आहे. मात्र भाजपानं या आरोपाचा इन्कार केला आहे. काँग्रेस सोडून भाजपावासी झालेले दिग्गज नेते टॉम वडक्कन यांनी सरकारच्या निर्णयाचं समर्थन केलं आहे. 'अति महत्त्वाच्या व्यक्तींच्या संरक्षणाची जबाबदारी केंद्र सरकारची असते. प्रत्येक ठिकाणी या व्यक्ती सुरक्षित राहतील हे पाहणं सरकारचं कर्तव्य असतं,' असं वडक्कन म्हणाले.

एसपीजीच्या नियमात करण्यात आलेले बदल सुरक्षेसाठी करण्यात आलेले असून त्यामागे पाळत ठेवण्याचा हेतू नसल्याचं वडक्कन यांनी स्पष्ट केलं. त्यांना (गांधी कुटुंबाला) जिथे जायचं असेल, तिथे ते जाऊ शकतात. त्यांचं स्वातंत्र्य अबाधित आहे. मात्र त्यांच्या बाबतीत एखादा अनुचित प्रकार घडू नये यासाठीच हे पाऊल उचलण्यात आल्याचं ते पुढे म्हणाले. सध्या राहुल गांधी परदेश दौऱ्यावर असल्याचं बोललं जातं. काल ते बँकॉकला असल्याची चर्चा होती. राहुल यांच्या परदेश दौऱ्यावर अनेकदा भाजपानं निशाणा साधला आहे. राहुल गांधी नेमके जातात कुठे हे त्यांनी देशाला सांगायला हवं, अशी मागणी करत भाजपानं अनेकदा त्यांच्यावर टीकास्त्र सोडलं आहे. 

Web Title: modi government revises security rules for Gandhi family says SPG will accompany them at all times

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.