अमित शहांचा 'तो' दावा मोदी सरकारने फेटाळला
By Admin | Updated: December 3, 2014 15:10 IST2014-12-03T15:08:48+5:302014-12-03T15:10:30+5:30
शारदा चिटफंड घोटाळ्यातील पैसा दहशतवादी कारवायांसाठी वापरल्याचा गंभीर आरोप भाजपाध्यक्ष अमित शहा यांनी केला असला तरी मोदी सरकारने या आरोपांमध्ये तथ नसल्याचे म्हटले आहे.

अमित शहांचा 'तो' दावा मोदी सरकारने फेटाळला
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. ३ - शारदा चिटफंड घोटाळ्यातील पैसा दहशतवादी कारवायांसाठी वापरल्याचा गंभीर आरोप भाजपाध्यक्ष अमित शहा यांनी केला असला तरी मोदी सरकारने या आरोपांमध्ये तथ नसल्याचे म्हटले आहे. यामुळे अमित शहा तोंडघशीच पडले असून भाजपाध्यक्षांनी माफी मागावी अशी मागणी तृणमूल काँग्रेसच्या नेत्यांनी केली आहे .
भाजपाध्यक्ष अमित शहा यांनी रविवारी कोलकाता येथील सभेत मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि तृणमूलवर टीका करताना शारदा चिटफंड घोटाळ्यातील पैसा बर्दमान येथील स्फोटांमध्ये वापरण्यात आला होता अशी टीका केली होती. यासंदर्भात राज्यसभेतही प्रश्न उपस्थित झाला होता. यावर बुधवारी पंतप्रधान कार्यालयाचे राज्यमंत्री जितेंद्र सिंह यांनी राज्यसभेसमोर लेखी उत्तर दिल्याचे समजते. यामध्ये 'शारदा चिटफंड घोटाळ्यातील पैसा दहशतवादी कारवायांसाठी वापरल्याचा पुरावा अद्याप तरी मिळालेला नाही' असे या उत्तरात स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे मोदी सरकारनेच अमित शहांचा दावा फेटाळल्याचे चित्र निर्माण झाले आहे.