अब की बार, ऍपमधून कामाचा हिशेब देणार सरकार
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2018 18:38 IST2018-12-26T15:56:57+5:302018-12-26T18:38:18+5:30
जानेवारीमध्ये सरकार देणार योजनांची माहिती आणि आकडेवारी

अब की बार, ऍपमधून कामाचा हिशेब देणार सरकार
नवी दिल्ली: आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोदी सरकार आपल्या महत्त्वाकांक्षी योजनांची माहिती आणि आकडेवारी लोकांसमोर ठेवणार आहे. सरकारची कामगिरी ऍपच्या माध्यमातून जनतेपर्यंत पोहोचवण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. या माध्यमातून स्मार्ट सिटी, प्रत्येकासाठी घर, अमृत, स्वच्छ भारत, हृदय या योजनांची माहिती लोकांपर्यत पोहोचवली जाणार आहे.
मोदी सरकारच्या महत्त्वाकांक्षी योजना, त्यामुळे साध्य झालेली कामगिरी, त्यांच्यी सध्याची स्थिती याची माहिती एका विशेष ऍपच्या माध्यमातून सरकारमार्फत जनतेसाठी उपलब्ध करुन देण्यात येईल. यामधील सर्वाधिक माहिती शहर आणि घरकुल विकास मंत्रालयाशी संबंधित असेल. जानेवारी महिन्यात ही माहिती सर्वसामान्य जनतेसाठी उपलब्ध असेल. जनतेपासून कोणतीही माहिती लपवू नये, या मतापर्यंत पोहोचल्यानंतर योजनांची माहिती आणि आकडेवारी प्रसिद्ध करण्याचा निर्णय घेण्यात आला, असं एका वरिष्ठ अधिकाऱ्यानं नाव प्रसिद्ध न करण्याच्या अटीवर सांगितलं.
सर्व योजनांची माहिती आणि आकडेवारी ऍपच्या माध्यमातून जनतेपर्यंत पोहोचवण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याची माहिती अधिकाऱ्यानं दिली. यामुळे प्रशासनातील पारदर्शकता वाढेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. या ऍपमध्ये पायाभूत सुविधांचं जियो टॅगिंग केलं जाईल. याशिवाय विकासकामांचे व्हिडीओ, फोटो आणि पत्तेदेखील दिले जातील. आतापर्यंत ग्रामीण विकास मंत्रालयानं त्यांच्या महत्त्वाकांक्षी योजनेसाठी असं पाऊल उचललं आहे. मात्र स्वच्छ भारत योजनेच्या अंतर्गत अशी माहिती कशी द्यायची, असा प्रश्न अधिकाऱ्यांना पडला आहे.