आयएसआयला ७0 वर्षात जमले नाही ते मोदी सरकारने ३ वर्षात करून दाखवले

By ऑनलाइन लोकमत | Published: November 27, 2017 11:06 AM2017-11-27T11:06:15+5:302017-11-27T11:15:36+5:30

भारतात हिंदु आणि मुस्लीम समुदायांनी आपसात भांडावे, धार्मिक वादावरून त्यांचे विभाजन व्हावे, देशात विव्देशाचे वातावरण तयार व्हावे, हे तर पाकिस्तानचे जुने स्वप्न आहे.

The Modi government has not been able to present the ISI in 70 years | आयएसआयला ७0 वर्षात जमले नाही ते मोदी सरकारने ३ वर्षात करून दाखवले

आयएसआयला ७0 वर्षात जमले नाही ते मोदी सरकारने ३ वर्षात करून दाखवले

Next

सुरेश भटेवरा
नवी दिल्ली : भारतात हिंदु आणि मुस्लीम समुदायांनी आपसात भांडावे, धार्मिक वादावरून त्यांचे विभाजन व्हावे, देशात विव्देशाचे वातावरण तयार व्हावे, हे तर पाकिस्तानचे जुने स्वप्न आहे. पाकिस्तानची गुप्तचर यंत्रणा आयएसआय त्यासाठी सातत्याने प्रयत्न करीत आली आहे मात्र आयएसआयला जे ७0 वर्षात जमले नाही ते मोदी सरकारने अवघ्या ३ वर्षात करून दाखवले. हिंदुत्वाचा अजेंडा पुढे रेटण्यासाठी हिंदु मुस्लिमांमधे तेढ निर्माण करण्याचा पध्दतशीर प्रयत्न मोदी सरकार, भाजप आणि त्यांच्या समर्थकांनी चालवला आहे. हा डाव हाणून पाडण्यासाठी गुजराथच्या निवडणुकीत जो भाजपचा हमखास पराभव करील, अशाच उमेदवाराला व पक्षाला विजयी करा, असे आवाहन दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी रामलीला मैदानावर आम आदमी पक्षाच्या पंचवार्षिक वर्धापनदिनानिमित्त आयोजित भव्य संमेलनात केले. मोठी उपस्थिती असलेल्या संमेलनाच्या व्यासपीठावर उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया, आशुतोश, गोपाल राय, कुमार विश्वास, आतिशी मर्लेना आदी नेते उपस्थित होते.

‘आप’ संमेलनात मोदी सरकार व भाजपवर तुफान टिकेचे चौफेर वार करीत अरविंद केजरीवाल म्हणाले, ‘देशात दोन समुदायांमधे वैर निर्माण करणारे व आयएसआय एजंटांमधे फरक तो काय? देशप्रेमाचा मुखवटा चढवलेले हे लोकच खरे देशद्रोही आहेत. दररोज या देशाला कमजोर करीत आहेत. गुजराथच्या सत्तेतून भाजपला बाहेर केले तर केंद्रीय सत्तेचा पाया खिळखिळा होईल, यासाठी सर्वप्रथम गुजराथमधून भाजपच्या सत्तेचे उच्चाटन केले पाहिजे. उमेदवार कोण, त्याचा पक्ष कोणता, याची फिकीर करण्यापेक्षा भाजपला पराभूत करण्याची क्षमता ज्याच्यात आहे, या एकमेव निकषावर विरोधी उमेदवाराला मतदान करा. गुजराथमधे १८२ जागांपैकी ‘आप’ ने फक्त २0 मतदारसंघात उमेदवार उभे केले आहेत. जिथे ‘आप’ उमेदवार मजबूत असेल तिथे त्याला मतदान करा अन्यथा विजयाच्या स्पर्धेत आघाडीवर असलेल्या भाजप विरोधक उमेदवाराच्या पाठिशी सारी शक्ती उभी करा, असे आवाहनही केजरीवालांनी ‘आप’ च्या गुजराथ येथील कार्यक र्त्यांना केले.

भ्रष्टाचाराच्या मुद्यावर भाजपवर हल्ला चढवतांना केजरीवाल म्हणाले, काँग्रेसच्या तुलनेत भाजपचा भ्रष्टाचार किंचितही कमी नाही. राफेल विमान खरेदी घोटाळा, व्यापम घोटाळा, बिर्ला डायरी, सहारा डायरी, अशी भाजपच्या घोटाळयांची कितीतरी उदाहरणे देता येतील. मोदी सरकारच्या राजवटीत न्यायाधिश देखील सुरक्षित नाहीत हे चित्र नुकतेच सामोरे आले आहे. काँग्रेसच्या भ्रष्ट राजवटीला ज्या प्रकारे तुम्ही उखडून फेकलेत त्याच पध्दतीने भाजपचे सरकारही आता सत्तेतून पायउतार झाले पाहिजे, अशी वेळ आता येउन ठेपली आहे. दिल्लीत ‘आप’ सरकारचा इतका धसका मोदी सरकारने घेतला आहे की दिल्ली सरकारकडून भ्रष्टाचार प्रतिबंधक विभाग काढून घेण्यासाठी त्यांनी थेट निमलष्करी दलाचा त्यांनी वापर केला. भारताच्या इतिहासात बहुदा प्रथमच अशी घटना घडली असेल की राज्य सरकारच्या ताब्यातली वास्तू काढून घेण्यासाठी केंद्राने बळाचा वापर केला.
 

Web Title: The Modi government has not been able to present the ISI in 70 years

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.