शेतकऱ्यांना दिवाळी भेट, रब्बी हंगामासाठी मोदी सरकारने वाढवली MSP, जाणून घ्या किती होणार फायदा?
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 18, 2022 16:05 IST2022-10-18T16:04:32+5:302022-10-18T16:05:54+5:30
Diwali Gift To Farmers: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या आर्थिक घडामोडींच्या मंत्रिमंडळ समितीच्या बैठकीत एमएसपी वाढवण्यास मंजुरी देण्यात आली आहे.

शेतकऱ्यांना दिवाळी भेट, रब्बी हंगामासाठी मोदी सरकारने वाढवली MSP, जाणून घ्या किती होणार फायदा?
नवी दिल्ली : मोदी सरकारने काल पीएम किसान योजनेचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात ट्रान्सफर केले. त्यानंतर आज सरकारने दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना आणखी एक भेट दिली आहे. केंद्राच्या नेतृत्वाखालील मोदी सरकारने 2023-24 च्या रब्बी हंगामासाठी रब्बी पिकांच्या किमान आधारभूत किमतीत वाढ करण्याची घोषणा केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या आर्थिक घडामोडींच्या मंत्रिमंडळ समितीच्या बैठकीत एमएसपी वाढवण्यास मंजुरी देण्यात आली आहे.
येत्या रब्बी हंगामासाठी सरकारने गव्हाच्या एमएसपीमध्ये 110 रुपये प्रति क्विंटल 2015 वरून 2125 रुपये प्रति क्विंटल वाढ केली आहे. चण्याच्या एमएसपीमध्येही 110 रुपयांची वाढ करण्यात आली असून ती 5230 रुपयांवरून 5335 रुपये प्रति क्विंटल झाली आहे. सरकारने मसूरच्या एमएसपीमध्ये सर्वाधिक वाढ केली आहे. मसूरच्या एमएसपीमध्ये प्रति क्विंटल 500 रुपयांची वाढ करण्यात आली आहे.
मसूरची एमएसपी 5500 रुपयांवरून 6000 रुपये प्रति क्विंटल करण्यात आली आहे. रेपसीड (पांढरी मोहरी) आणि पिवळी मोहरीची एमएसपी प्रति क्विंटल 400 रुपयांनी वाढवून 5050 रुपयांवरून 5450 रुपये प्रति क्विंटल करण्यात आली आहे. सैफ फ्लॉवरच्या एमएसपीमध्ये 209 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. सैफ फ्लॉवरची एमएसपी 5441 रुपयांवरून 5650 रुपये प्रति क्विंटल करण्यात आली आहे. बार्लीच्या एमएसपीमध्ये 100 रुपयांची वाढ करण्यात आली असून ती 1635 रुपयांवरून 1735 रुपये प्रति क्विंटल करण्यात आली आहे.
2018-19 च्या केंद्रीय अर्थसंकल्पात उत्पादन खर्चाच्या 1.5 पट एमएसपी देण्याच्या घोषणेच्या अनुषंगाने रब्बी पिकांच्या एमएसपीमध्ये वाढ केल्याचा सरकारचा दावा आहे. तसेच, रेपसीड आणि मोहरीवर 104 टक्के परतावा मिळेल असा सरकारचा दावा आहे. गव्हावर 100 टक्के, मसूरवर 85 टक्के, चण्यावर 66 टक्के, सैफ फ्लॉवरवर 50 टक्के आणि बार्लीवर 60 टक्के परतावा मिळत आहे.
दरम्यान, कृषी तेलबिया आणि कडधान्यांचे उत्पादन वाढवण्यावर सरकार सातत्याने लक्ष केंद्रित करत असून त्याचे परिणामही दिसू लागले आहेत. तेलबियांचे उत्पादन 2014-15 मधील 27.51 दशलक्ष टनांवरून 2021-22 मध्ये 37.70 दशलक्ष टनांपर्यंत वाढविण्यात यश आले आहे. डाळींचे उत्पादन वाढवण्यातही यश आले आहे.