मोदी सरकारने दिल्ली स्फोटाला दहशतवादी घटना मानले; चौकशीचे दिले आदेश
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 12, 2025 21:12 IST2025-11-12T20:59:41+5:302025-11-12T21:12:48+5:30
केंद्रीय मंत्रिमंडळाने १० नोव्हेंबर रोजी नवी दिल्लीतील लाल किल्ल्याजवळ झालेल्या कार बॉम्बस्फोटाला निंदनीय दहशतवादी हल्ला म्हणून घोषित करण्याचा ठराव मंजूर केला.

मोदी सरकारने दिल्ली स्फोटाला दहशतवादी घटना मानले; चौकशीचे दिले आदेश
मोदी मंत्रिमंडळाने १० नोव्हेंबर रोजी नवी दिल्लीतील लाल किल्ल्याजवळ झालेल्या कार स्फोटाला "निंदनीय दहशतवादी हल्ला" घोषित करण्याचा ठराव मंजूर केला आहे. या ठरावाद्वारे, मंत्रिमंडळाने पीडितांना श्रद्धांजली वाहिली आणि त्यांच्या कुटुंबियांना तीव्र सहानुभूती व्यक्त केली. या घटनेला "राष्ट्रविरोधी घटकांचे कट" असे संबोधत, मंत्रिमंडळाने दहशतवादाप्रती "पूर्ण असहिष्णुता" देण्याच्या सरकारच्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार केला.
मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी याबाबत माहिती दिली. '१० नोव्हेंबर रोजी लाल किल्ल्याजवळ झालेल्या बॉम्बस्फोटाद्वारे देशविरोधी शक्तींनी केलेल्या भ्याड दहशतवादी कृत्याने संपूर्ण देशाला धक्का बसला आहे. मंत्रिमंडळाने या घटनेची निष्पक्ष चौकशी करण्याचे निर्देश दिले आहेत', अश माहिती अश्विनी वैष्णव यांनी दिली.
Govt of India terms the Delhi blast a "terrorist incident" by "anti-national forces" https://t.co/dQ3XyG16afpic.twitter.com/d3GQgsy2ze
— ANI (@ANI) November 12, 2025
तत्पूर्वी, पंतप्रधान मोदींनी बुधवारी लाल किल्ल्याजवळ झालेल्या स्फोटात जखमी झालेल्या लोकांची एलएनजेपी रुग्णालयात भेट घेतली आणि दोषींना शिक्षा होईल असे सांगितले. पंतप्रधान सुमारे २५ मिनिटे रुग्णालयात होते. सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एक पोस्ट शेअर करताना त्यांनी लिहिले की, "दिल्ली बॉम्बस्फोटात बाधित झालेल्या लोकांना भेटण्यासाठी एलएनजेपी रुग्णालयात पोहोचलो. मी सर्वांना लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा देतो. या कटात सहभागी असलेल्या सर्वांना शिक्षा होईल, असंही त्यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे.
पोलिसांनी जैश-ए-मोहम्मद आणि अन्सार गजवत-उल-हिंदशी संबंधित दहशतवादी नेटवर्कचा पर्दाफाश केल्यानंतर आणि तीन डॉक्टरांसह आठ संशयितांना ताब्यात घेतल्यानंतर काही तासांतच, दिल्लीच्या लाल किल्ला परिसराजवळ एका कारमध्ये मोठा स्फोट झाला. यामध्ये १२ जणांचा मृत्यू झाला आणि अनेक जण जखमी झाले. जम्मू-काश्मीर, हरयाणा आणि उत्तर प्रदेशमध्ये सक्रिय असलेल्या या दहशतवादी मॉड्यूलचा पोलिसांनी पर्दाफाश केला.