मोदी : मोठी मोहीम, फार मोठा विजय

By Admin | Updated: May 30, 2014 02:03 IST2014-05-30T02:03:49+5:302014-05-30T02:03:49+5:30

लोकसभा निवडणुकीची अधिसूचना निघण्याआधीच निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली होती.

Modi: Big campaign, big victory | मोदी : मोठी मोहीम, फार मोठा विजय

मोदी : मोठी मोहीम, फार मोठा विजय

खा. विजय दर्डा - लोकसभा निवडणुकीची अधिसूचना निघण्याआधीच निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली होती. १३ सप्टेंबर २०१३ रोजी गोव्यात झालेल्या बैठकीत भारतीय जनता पक्षाचे पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांची निवड करण्यात आली, तेव्हाच निवडणूक प्रचाराचे रणशिंग फुंकले गेले होते. या तारखेपासून १६ मे रोजी मतमोजणी सुरू होऊन निकाल जाहीर होईपर्यंत एकही क्षण कंटाळवाणा गेला नाही. आता पुढे काय होणार, या उत्सुकतेने हा संपूर्ण काळ भरलेला होता. लोकांना खिळवून ठेवणार्‍या या निवडणुकीत भाजपाला स्वबळावर बहुमत मिळाले. लोकसभेच्या ५४३ जागांपैकी २८२ जागा जिंकताना मोदींच्या नेतृत्वात भाजपाने अभूतपूर्व विजय मिळवला. मोदींनी केवळ निवडणूक जिंकली नाही. विजयाच्या मार्गावर चालताना अनेक लढाया जिंकल्या. एकेकाळचे त्यांचे नेते लालकृष्ण आडवाणी यांच्याविरुद्ध घरातली लढाई त्यांना लढावी लागली. गुजरात दंगलीचे भूत त्यांची पाठ सोडायला तयार नव्हते. जातीयवादी, हुकूमशहा प्रवृत्तीचे अशा आशयाची त्यांची प्रतिमा जनमानसात तयार झाली होती. त्यांच्या भूतकाळाला घेऊन जेवढे हल्ले झाले, तेवढे गुजरातच्या कुण्या मुख्यमंत्र्यावर झाले नसतील. ही प्रतिमा झटकून भारतासारख्या सांस्कृतिक विविधता लाभलेल्या देशाचा सर्वसमावेशक पंतप्रधान म्हणून स्वत:ला सादर करण्याचेही आव्हान त्यांच्यापुढे होते. मोदींविरुद्ध सर्व अशीच ही निवडणूक होती. मोदींनी ती एकहाती जिंकली. आपल्या निवडणुकांवर सुरुवातीपासूनच व्यक्तिमत्त्वाची छाप राहिली आहे. ब्रिटिश पद्धतीची संसदीय प्रणाली आपण स्वीकारली आहे. संसद सदस्य आपला (पान १ वरून) पंतप्रधान निवडतात. ब्रिटिश मॉडेल असले तरी देशाने अमेरिकन अध्यक्षीय पद्धतीच्या निवडणूक मोहिमाही पाहिल्या आहेत. अशा पद्धतीच्या मोहिमांमध्ये प्रमुख नेत्याभोवती निवडणूक फिरत असते. त्या नेत्याला टारगेट केले जाते. त्याला विरोधकांची टीका, वार झेलावे लागतात. पं. जवाहरलाल नेहरूंच्या काळात असे म्हटले जायचे की, विजेच्या खांबालाही पंडितजी निवडून आणू शकतात. आताची निवडणूकही अशीच व्यक्तिमत्त्वकेंद्रित निवडणूक होती. मोदींनी ती नव्या पद्धतीने लढवली. मोदींनी मल्टी-मीडिया संपर्क, मार्केटिंग आणि इव्हेंट मॅनेजमेंट यांची मदत घेऊन आपली मोहीम अधिक धारदार बनवली. कधीही पाहिली नाही एवढ्या मोठ्या प्रमाणावर ही मोहीम राबवण्यात आली. तिचे फायदेही झाले. मोदी निवडून येत आहेत असे एकूण वातावरण तयार झाले होते. मतदारांचे शहाणपण भारतीय मतदार हुशार आहेत. निकालाचा तपशीलवार अभ्यास केला असता ही गोष्ट लक्षात येते. निवडणुकांच्या राजकीय गोंगाटातही कुठली गोष्ट त्याच्या हिताची आहे हे त्याला छान कळते. देशाच्या विविध भागात विखुरलेले लोक एकच कौल देतात ही बाब विलक्षणच म्हटली पाहिजे. यंदाच्या जनमताच्या कौलाने राजकीय अस्थैर्याचे, त्रिशंकू लोकसभेचे दिवस गेले, अशी आशा करू या. राज्यांमध्येही आघाडी सरकारे असणार नाहीत अशी आशा या कौलाने जागवली. भाजपाने स्वबळावर बहुमत कमावले. भाजपाच्या अनेक नेत्यांनाही अशा ऐतिहासिक विजयाची अपेक्षा नव्हती. आघाडी सरकारमध्ये घटक पक्षांच्या लहरी सांभाळाव्या लागत. मतदारराजाने या कोंडीतून सत्ताधार्‍यांची सुटका केली. भारतीय मतदारांची सामूहिक हुशारी यातून प्रगट होते. मतदारांचे हे सामूहिक शहाणपण वाखाणण्याजोगे आहे. गुजरात, राजस्थान, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश आणि दिल्ली या राज्यांतील एकही जागा भाजपाच्या हातून निसटली नाही. उत्तर प्रदेश, महाराष्टÑ, बिहार, मध्य प्रदेश, छत्तीसगड या राज्यांमध्येही भाजपाची पकड दिसून आली. दुसरा कुठलाही पक्ष दोन आकडी जागा जिंकू शकला नाही. ब्रँड मोदी आणि त्यांच्या आक्रमक मोहिमेच्या यशाचा हा संख्यात्मक पुरावा म्हणता येईल. भाषणे घरोघरी पोहोचली हे टेलिव्हिजनचे युग आहे. कुठलीही घटना घडते तशी तुम्हाला टीव्हीवर पाहता येते. काही क्षणातच त्याचे परिणाम पाहायला मिळतात. काही हजारांच्या जाहीर सभेत एखादा नेता भाषण करीत असेल. पण पडद्यावर लाखो लोकांपर्यंत त्याचा संदेश जात असतो. नेत्याची सभा दिवसभर टीव्हीवर दाखवली जाते. तेवढ्या प्रमाणात त्याला काय म्हणायचे आहे हे दरवेळी अधिकाधिक लोकापर्यंत पोचत असते. मोदींसाठी मीडियाने ही सकारात्मक भूमिका निभावली. भाजपाचे नारे घराघरात पोचले गेले. मतदानाला सहसा न जाणार्‍या तरुणांनाही या नार्‍यांनी खेचले. मोदींची मोहीम तेवढ्यावर थांबली नव्हती. तिच्या भात्यात नाना प्रकारची अस्त्रेशस्त्रे होती. लहान सभा, पथनाट्ये इथपासून तो मोठ्या सभा, हायटेक थ्री डी सभा, रोशनाईने फुलवलेले होर्डिंग्ज, वृत्तपत्रांतल्या जाहिराती...मिळेल त्या मार्गाने मोदी सहा लाख खेड्यांपैकी बहुसंख्य खेड्यांमध्ये पोचवण्यात आले. घराघरात पोचवण्यात आले. टीव्ही संच, रेडिओच नाही तर सेलफोन, व्हॉटस्अ‍ॅप, यु ट्यूब आणि इंटरनेटची मदत घेण्यात आली. मोदी काय म्हणत आहेत हे तुम्हाला ऐकावेच लागत होते. मोदींना तुम्ही टाळू शकत नव्हते. मोदी पट्टीचे वक्ते आहेत. हा गुण मोदींच्या कामी आला. अशा राजकीय पुढार्‍याशी त्यांचा सामना होता की, ज्याला राजकारणात विशेष रस नव्हता. राष्टÑीय स्वयंसेवक संघाच्या स्वयंसेवकांनी निष्ठेने आधार दिला. यातून रस्त्यातले संभाव्य धोके टाळले गेले. मोदींना भाजपाचा पंतप्रधानपदाचा उमेदवार बनवले हाच मुळात एक जुगार होता. जुगारामागच्या तर्काने काम केले. जेवढा जास्त धोका पत्कराल, तेवढा अधिक फायदा होतो. (क्रमश:)

Web Title: Modi: Big campaign, big victory

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.