जिथे नेटवर्क नाही, तिथेही मोबाइल चालणार; आपत्तींतही इंटरनेट मिळेल
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 25, 2025 05:54 IST2025-12-25T05:53:56+5:302025-12-25T05:54:30+5:30
मोबाइल फोनला सिग्नल देणारा ‘ब्लूबर्ड ब्लॉक-२’ हा संचार उपग्रह अवकाशात पोहोचला

जिथे नेटवर्क नाही, तिथेही मोबाइल चालणार; आपत्तींतही इंटरनेट मिळेल
श्रीहरिकोटा (आंध्र प्रदेश) : डोंगराळ भागात, जंगलात, दुर्गम गावांमध्ये, समुद्रात, सीमावर्ती भागांमध्ये, अगदी पूर, भूकंप तथा चक्रीवादळासारख्या आपत्तीच्या वेळीही कॉल, मेसेज आणि इंटरनेट उपलब्ध होणार आहे. हा बदल शक्य करणारा थेट मोबाइल फोनला सिग्नल देणारा ‘ब्लूबर्ड ब्लॉक-२’ हा अत्याधुनिक संचार उपग्रह अवकाशात पोहोचला आहे. भारताच्या इस्रोने आपल्या सर्वात बलाढ्य एलव्हीएम-३ रॉकेटच्या मदतीने हा सर्वांत मोठा उपग्रह अवकाशात पोहोचवला आहे.
ख्रिसमसच्या आदल्या दिवशी श्रीहरिकोटातून यशस्वीपणे पार पडलेली ही प्रक्षेपण मोहीम केवळ वैज्ञानिक यश नाही, तर जगभरातील मोबाइल वापरकर्त्यांसाठी कनेक्टिव्हिटीचा नवा अध्याय आहे. ६,१०० किलो वजनाचा हा उपग्रह पृथ्वीच्या निम्न कक्षेत अचूकपणे स्थापन करून इस्रोने भारताची
जागतिक स्पेस-टेक सामर्थ्य पुन्हा सिद्ध केले आहे.
याचा नेमका फायदा काय?
नेटवर्क बंद पडलं तरी एसओएस कॉल, मदतीचा मेसेज, रेस्क्यू टीमशी संपर्क करता येऊ शकेल. आपत्तीच्या वेळी हा उपग्रह लाइफलाइन ठरू शकतो.
ही मोठी गोष्ट का आहे?
इस्रोने जगाला दाखवून दिलं – “आम्ही हे करू शकतो.” आता जगातल्या कंपन्या इस्रोलाच लाँचसाठी पसंती देतील.
भारताला यामधून पैसे आणि प्रतिष्ठा दोन्ही मिळेल. ही मोहीमही पैसे घेऊन केली आहे, म्हणजेच भारताला परकीय चलन मिळाले.
नवीन फोन घ्यावा लागेल का?
नाही. हा उपग्रह सामान्य स्मार्टफोनसाठीच डिझाइन केला आहे. वेगळा सॅटेलाइट फोन, अँटेना काहीच लागत नाही.
उपग्रह खास का?
याचा अँटेना खूप मोठा आहे एकाच वेळी लाखो मोबाइल फोनशी संपर्क करू शकतो.
‘नो सिग्नल’ शब्द इतिहासजमा
अजून असे उपग्रह अवकाशात सोडले जातील. त्यामुळे मोबाइल नेटवर्क जगभर समान होईल.
हे भारताच्या अंतराळ प्रवासातील एक गौरवशाली पर्व आहे. जागतिक प्रक्षेपण बाजारातील भारताची वाढती भूमिका आणखी मजबूत झाली आहे.
नरेंद्र मोदी, पंतप्रधान
गगनयान मोहिमेच्या दृष्टीने मानवरहित उड्डाणे पूर्ण करणे हे पुढील उद्दिष्ट असून, आम्ही त्याच दिशेने पुढे जात आहोत.
व्ही. नारायणन, अध्यक्ष, इस्रो