बलात्का-यांना पोलीस स्टेशनमधून फरफटत आणून जिवंत जाळलं, पाच वर्षाच्या चिमुरडीवर केला होता बलात्कार
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2018 13:36 IST2018-02-20T10:24:10+5:302018-02-20T13:36:41+5:30
बलात्कार आरोपी आणि त्याच्या सहका-याला जमावाने पोलीस ठाण्यातून फरफटत नेत हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे

बलात्का-यांना पोलीस स्टेशनमधून फरफटत आणून जिवंत जाळलं, पाच वर्षाच्या चिमुरडीवर केला होता बलात्कार
गुवाहाटी - बलात्कार आरोपी आणि त्याच्या सहका-याला जमावाने पोलीस ठाण्यातून फरफटत नेत हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. अरुणाचलमधील लोहित जिल्ह्यात ही घटना घडली आहे. जवळपास 800 लोकांनी तेझू पोलीस ठाण्यात घुसून तोडफोड केली आणि आरोपींना खेचून बाहेर काढलं. यानंतर त्यांना बाजारात नेऊन सर्वांसमोर हत्या केली. पोलिसांनी अद्याप याप्रकरणी कोणाला अटक केलेली नाही.
एका साक्षीदाराने दिलेल्या माहितीनुसार, 'सकाळी 11.30 वाजण्याच्या सुमारास जमाव पोलीस स्थानकाबाहेर जमा झाला होता. यावेळी जमाव बलात्काराचे आरोपी संजय सोबोर आणि जगदीश लोहार यांना आपल्याकडे सोपवण्याची मागणी करत होता. संजय सोबोर या आरोपीवर एका पाच वर्षाच्या मुलीवर बलात्कार केल्याचा आरोप होता. या गुन्ह्यात जगदीश लोहारने त्याला मदत केली होती. पोलिसांनी आरोपींना सोपवण्यास नकार दिल्यानंतर जमावाने पोलीस ठाण्यात तोडफोड करण्यास सुरुवात केली. यानंतर जमावाने पोलीस कर्मचा-यांना न जुमानता लॉकअप तोडलं आणि दोन्ही आरोपींना फरफटत मार्केट परिसरात नेलं आणि हत्या केली. हत्या केल्यानंतर मृतदेह तिथेच टाकून जमावाने पळ काढला'.
घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस अधिका-यांनी घटनास्थळी धाव घेतली. 'आम्ही घटनेच्या चौकशीचा आदेश दिला आहे. अद्याप कोणालाही ताब्यात घेण्यात आलेलं नाही', अशी माहिती पोलीस अधिक्षकांनी दिली आहे.
पाच वर्षाची मुलगी नामगो गावातून 12 फेब्रुवारीला बेपत्ता झाली होती. पोलिसांनी तपास सुरु केला होता. 17 फेब्रुवारीला घरापासून 400 मीटर अंतरावर चिमुरडीचा मृतदेह नग्न अवस्थेत आढळला होता. पोलिसांनी तपासाची सुत्रं हलवत संजय सोबोर आणि जगदीश लोहारला अटक केली. दोघांनाही न्यायालयात हजर केलं असता पोलीस कोठडी सुनावण्यात आली. आपणच बलात्कार केल्याचा गुन्हा त्यांनी कबूल केला होता. चहाच्या मळ्यात नेऊन आपण चिमुरडीवर बलात्कार केला होता. पण तिने रडण्यास सुरुवात केल्यानंतर आपण तिची हत्या करुन घटनास्थळावरुन पळ काढला असल्याचं त्याने पोलिसांना सांगितलं होतं.