निवृत्तीनंतर २० वर्षांपर्यंत...; जनरल नरवणे यांच्या पुस्तकासंदर्भातील वादावर राजनाथ सिंह पहिल्यांदाच बोलले, म्हणाले...
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 21, 2026 18:31 IST2026-02-21T18:29:43+5:302026-02-21T18:31:32+5:30
याच बरोबर, निवृत्तीनंतर २० वर्षांपर्यंत लष्करी अधिकाऱ्यांना पुस्तके लिहिता येणार नाही, अशा चर्चाही त्यांनी पूर्णपणे फेटाळून लावल्या.

निवृत्तीनंतर २० वर्षांपर्यंत...; जनरल नरवणे यांच्या पुस्तकासंदर्भातील वादावर राजनाथ सिंह पहिल्यांदाच बोलले, म्हणाले...
माजी लष्करप्रमुख जनरल एम. एम. नरवणे यांच्या आत्मचरित्रावरून निर्माण झालेल्या वादानंतर संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी पहिल्यांताच स्पष्टपणे आपली भूमिका मांडली आहे. "माजी लष्करप्रमुखांना पुस्तके लिहिण्यापासून रोखले जाणार नाही," असे त्यांनी स्पष्ट केले आहे. याच बरोबर, निवृत्तीनंतर २० वर्षांपर्यंत लष्करी अधिकाऱ्यांना पुस्तके लिहिता येणार नाही, अशा चर्चाही त्यांनी पूर्णपणे फेटाळून लावल्या.
नुकत्याच झालेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात राहुल गांधी यांनी जनरल नरवणे यांच्या पुस्तकाच्या प्रकाशनावरून सरकारला प्रश्न विचारले होते, यामुळे संसदेत प्रचंड गदारोळ झाला होता. निवृत्त जनरल नरवणे हे २०२० मध्ये गलवान खोऱ्यात चिनी सैनिकांसोबत झालेल्या चकमकीवेळी आणि सुरू असलेल्या सीमा वादादरम्यान, देशाचे लष्करप्रमुख होते (मार्च २०२०-एप्रिल २०२२). ऑक्टोबर २०२३ मध्ये, जनरल नरवणे यांनी पीटीआय वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत खुलासा केला की त्यांनी त्यांचे आत्मचरित्र, 'फॉर स्टार्स ऑफ डेस्टिनी' लिहिले आहे. पीटीआयने या पुस्तकातील काही उतारेही प्रसिद्ध केले होते.
पुस्तकात काय? -
जनरल नरवणे यांनी या पुस्तकात गलवान खोऱ्यातील संघर्षा (१५-१६ मे २०२०) पासून ते चीनसोबतच्या सैन्यविच्छेदन करारापर्यंत, म्हणजेच सीमा वादाच्या निराकरणापर्यंत सर्व तपशील उघड केले आहेत. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार (एनएसए) अजित डोवाल यांच्याशी फोनवरून झालेल्या संभाषणांचाही उल्लेख केला असल्याचे बोलले जाते. या पुस्तकात कॅबिनेट कमिटी ऑन सिक्युरिटी (सीसीएस) आणि चायना स्टडी ग्रुप (सीएसजी) यांच्या बैठकांचाही उल्लेख आहे.
दरम्यान, संरक्षण मंत्रालयाने थेट नरवणे यांच्याऐवजी प्रकाशन संस्थेकडून पुस्तकाचा संपूर्ण ड्राफ्ट मागवला. सूत्रांच्या माहितीनुसार, लष्कराशी संबंधित अत्यंत संवेदनशील माहिती सार्वजनिक होऊ नये, यासाठी 'ऑफिशियल सीक्रेट्स ॲक्ट' (OSA) आणि 'आर्मी ॲक्ट' अंतर्गत या पुस्तकाचे प्रकाशन रोखण्यात आले आहे. हे पुस्तक एप्रिल २०२४ मध्ये प्रकाशित होणार होते.