लाच मागणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना चपलेने मारणार, आमदाराने दिला इशारा
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2025 12:25 IST2025-02-10T12:04:12+5:302025-02-10T12:25:53+5:30
Bihar News: लाचखोरी आणि भ्रष्टाचारावर बोलताना ब्रजवासी यांनी सांगितले की, जे अधिकारी आणि कर्मचारी लाच मागतील त्यांना चपलेने मारण्यात येईल. आम्ही शिक्षकांचा आवाज दबू देणार नाही. जेवढी कमिशनखोरी आणि लाचखोरी आहे, त्याविरोधात आम्ही लढाई लढू, असं विधान शिक्षक नेते आणि विधान परिषद आमदार बंसीधर ब्रजवासी यांनी केलं आहे.

लाच मागणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना चपलेने मारणार, आमदाराने दिला इशारा
बिहारमधीलशिक्षक नेते आणि विधान परिषद आमदार बंसीधर ब्रजवासी यांनी लाचखोर अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्याविरोधात आक्रमक विधान केलं आहे. लाचखोरी आणि भ्रष्टाचारावर बोलताना ब्रजवासी यांनी सांगितले की, जे अधिकारी आणि कर्मचारी लाच मागतील त्यांना चपलेने मारण्यात येईल. आम्ही शिक्षकांचा आवाज दबू देणार नाही. जेवढी कमिशनखोरी आणि लाचखोरी आहे, त्याविरोधात आम्ही लढाई लढू.
बिहारमधील समस्तीपूरमधील शिक्षक नेता म्हणून राजकीय कारकीर्द सुरू करणाऱ्या तिरहूत पदवीधर मतदारसंघामधून विधान परिषद आमदार बनलेल्या बंसीधर ब्रजवासी यांचा सत्कार सोहळा परिवर्तनकारी प्राथमिक शिक्षक संघटनेने आयोजित केला होता. यावेळी बंसीधर ब्रजवासी यांनी भ्रष्टाचार आणि लाचखोरीविरोधात उघडपणे समोर येऊन लढण्याचं आवाहन केलं. तसेच त्यांनी सांगितले की, जर कुणी लाक किंवा कमिशन मागितलं तर त्याचा ऑडिओ व्हिडीओ तयार करा. मी स्वत येऊन त्याला पकडेन आणि त्याची चपलांनी धुलाई करेन.
ते पुढे म्हणाले की, संपूर्ण बिहार लाचखोरीमुळे त्रस्त आहे. पूर्णियामध्ये एका शिक्षिकेसोबत झालेल्या गैरवर्तनाबाबत बोलताना त्यांनी नितीश कुमार यांचं नाव न घेता त्यांच्यावर टीका केली. ते म्हणाले की, जिथे अशा प्रकारच्या घटना घडतात तिथे महिला सुरक्षित राहू शकत नाहीत. तसेच तिथल्या सत्तेच्या सिंहासनावर बसलेली व्यक्ती धृतराष्ट्र असते.
राज्याचे प्रमुख हे धृतराष्ट्राच्या भूमिकेत आहेत. या कार्यक्रमाला संबोधित करताना त्यांनी सांगितले की, संपूर्ण देशात एकसारखी शिक्षण व्यवस्था असली पाहिजे. तसेच एक देश एक शिक्षक एक वेतन योजना लागू करण्याचीही मागणी त्यांनी केली. दरम्यान, २०२५ मध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी शिक्षकांनी एकजूह होण्याचं आवाहनही त्यांनी केलं. तसेच शिक्षकांनी आता लढण्याची नाही तर आरपली ताकद दाखवण्याची गरज असल्याचेही त्यांनी सांगितले. यावेळी बिहार सरकारला इशारा देताना त्यांनी शिक्षणांच्या मागण्या मान्य केल्या गेल्या नाहीत तर सरकारला उखडून टाकू, असा इशाराही त्यांनी दिला.