'तुम्हाला कोंबडा बनवेन', निकृष्ट दर्जाचा रस्ता केल्यानं आमदारानं कंत्राटदाराला यथेच्छ सुनावलं; संपूर्ण रस्ता पुन्हा करायला सांगितला!
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 12, 2022 15:25 IST2022-07-12T15:23:55+5:302022-07-12T15:25:32+5:30
मध्य प्रदेशच्या शाजापूरमध्ये खराब रस्ता बनवल्याचं पाहून आमदाराला इतका राग आला की त्यानं सीएमओ आणि इंजिनिअरला सर्वांसमोर खडेबोल सुनावले.

'तुम्हाला कोंबडा बनवेन', निकृष्ट दर्जाचा रस्ता केल्यानं आमदारानं कंत्राटदाराला यथेच्छ सुनावलं; संपूर्ण रस्ता पुन्हा करायला सांगितला!
शाजापूर-
मध्य प्रदेशच्या शाजापूरमध्ये खराब रस्ता बनवल्याचं पाहून आमदाराला इतका राग आला की त्यानं सीएमओ आणि इंजिनिअरला सर्वांसमोर खडेबोल सुनावले. पोलायकलां नगर पंचायतच्या वॉर्ड क्रमांक १ मध्ये हे प्रकरण घडलं आहे. कालापीपलमधून काँग्रेस आमदार कुणाल चौधरी यांनी आपल्या विधानसभा मतदार संघात जनसंपर्क दौरा करत होते. यावेळी त्यांनी एका रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था पाहिली आणि त्यांच्या संतापाचा अनावर झाला. आमदारांनी थेट जिल्हाधिकाऱ्याला फोन करुन याची तक्रार केली आणि सीएमओसह इंजिनिअरला थेट कोंबडा बनवण्याची धमकीच दिली.
इथं नेमका कोणत्या स्वरुपाचा रस्ता तयार केला जातोय? ६५ लाख रुपये खर्च करुनही अत्यंत निकृष्ट दर्जाचा रस्ता तयार केला गेलाय असे खडेबोल आमदार कुणाल चौधरी यांनी कंत्राटदाराला सुनावले. "सीएमओ आणि इंजिनिअरला मी इथं साइटवर उभं केलं आहे. माझ्या मनात आलं तर मी इथंच दोघांना कोंबडा बनायला सांगेन. ही तर जनतेची लूट चालवली आहे. जनतेच्या पैशावर तुम्हा डल्ला मारण्याचं काम करत आहात", अशा कडक शब्दांत आमदार कुणाल चौधरी यांनी अधिकाऱ्यांची शाळा घेतली.
या घटनेनंतर आमदार चौधरी यांनी कंत्राटदाराला संपूर्ण रस्ता पुन्हा तयार करण्याचे निर्देश दिले. तसं जर नाही केलं तर मी धरणं आंदोलन करेन असाही इशारा त्यांनी यावेळी दिला. "जनतेच्या पैशाची लूट चालवली आहे. मी स्वत: इंजिनिअर आहे. रस्ता कसा करतात हे मलाही माहित आहे", असं कुणाल चौधरी म्हणाले.
दरम्यान, जिल्हाधिकारी दिनेश जैन यांनी संबंधित प्रकरणी आमदारांची तक्रार प्राप्त झाली असून सीएमओ आणि इंजिनिअरला तात्काळ तिथं जाऊन पाहणी करण्याचे निर्देश दिले असल्याचं सांगितलं.