आमदार, दोन माजी खासदारांना कैद
By Admin | Updated: June 4, 2015 23:31 IST2015-06-04T23:31:56+5:302015-06-04T23:31:56+5:30
पोलीस गोळीबाराशी संबंधित प्रकरणात गुरुवारी भाजपाचा एक आमदार व दोन माजी खासदारांसह १४ आरोपींना १० वर्षे कारावासाची शिक्षा ठोठावली. अन्य एका आरोपीस पाच वर्षे कैद देण्यात आली.

आमदार, दोन माजी खासदारांना कैद
सीतामढी (बिहार) : येथील अतिजलद न्यायालयाने १९९८ साली सीतामढी जिल्हाधिकारी कार्यालयावर झालेला हल्ला आणि त्यानंतरच्या पोलीस गोळीबाराशी संबंधित प्रकरणात गुरुवारी भाजपाचा एक आमदार व दोन माजी खासदारांसह १४ आरोपींना १० वर्षे कारावासाची शिक्षा ठोठावली. अन्य एका आरोपीस पाच वर्षे कैद देण्यात आली.
जिल्हाधिकारी कार्यालयावरील हल्ला आणि त्यानंतर पोलिसांनी केलेल्या गोळीबारात पाचजण मृत्युमुखी पडले होते. शिक्षा झालेल्यांमध्ये भाजपाचे आमदार राम नरेश यादव, सीतामढीतील संयुक्त जनता दलाचे माजी खासदार नवलकिशोर राय, शिवहरचे माजी खासदार आणि राष्ट्रीय जनता दलाचे नेते अनवारुल हक, राष्ट्रीय लोक समता पार्टीचे जिल्हा अध्यक्ष रामलशनसिंग कुशवाहा आणि सरचिटणीस मोहनकुमार सिंग यांचा समावेश आहे. (वृत्तसंस्था)
काय होते प्रकरण
११ आॅगस्ट १९९८ ची ही घटना आहे. भीषण पुरानंतर सीतामढी जिल्हाधिकारी कार्यालयापुढे आरोपी राजकीय नेत्यांच्या नेतृत्वात निदर्शने करण्यात आली होती. या आंदोलनाने हिंसक वळण घेतले आणि यात सामील लोकांनी परिसरात प्रचंड तोडफोड करण्यासोबतच तेथे उपस्थित अधिकाऱ्यांवर तुफान दगडफेक आणि हल्ला केला. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी लाठीमार आणि गोळीबार केला. पोलीस कारवाईत एक माजी आमदार आणि स्वातंत्र सेनानी राम चरित्र यादव यांच्यासह पाचजण मृत्युमुखी पडले. सीतामढीचे तत्कालीन दंडाधिकारी रामनंदन प्रसाद आणि पोलीस अधीक्षक परेश सक्सेना यांनी डुमरा पोलीस ठाण्यात ६० लोकांविरुद्ध गुन्हा नोंदविला होता. यापैकी ४५ लोकांना पुराव्याअभावी निर्दोष मुक्त करण्यात आले.