सीमांकनाच्या मुद्द्यावर स्टॅलिन यांनी बोलावली बैठक; भाजपच्या मुख्यमंत्र्यांनाही केले आवाहन...
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2025 19:16 IST2025-03-07T19:15:25+5:302025-03-07T19:16:40+5:30
एमके स्टॅलिन यांनी 7 राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना बैठकीसाठी बोलावले आहे.

सीमांकनाच्या मुद्द्यावर स्टॅलिन यांनी बोलावली बैठक; भाजपच्या मुख्यमंत्र्यांनाही केले आवाहन...
MK Stalin : गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या सीमांकनाच्या मुद्द्याने देशातील राजकारण तापले आहे. यामुळे उत्तर भारताच्या तुलनेत दक्षिण भारतातील खासदारांची संख्या कमी होईल, असा दावा तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन करत आहेत. याच पार्श्वभूमीवर त्यांनी शुक्रवारी 7 राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून सीमांकनाच्या मुद्द्यावर बैठकीसाठी बोलावले आहे. यात पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि भाजपशासित ओडिशाचे मुख्यमंत्री मोहन चरण माझी यांचाही समावेश आहे.
भाजपच्या मुख्यमंत्र्यांनाही आमंत्रण
मीडिया रिपोर्ट्सनुसार, एमके स्टॅलिन यांनी या सर्व मुख्यमंत्र्यांना केंद्राच्या प्रस्तावित सीमांकनाला विरोध करण्यासाठी स्थापन केलेल्या संयुक्त कृती समितीमध्ये सामील होण्याचे आवाहन केले आहे. त्यांनी केरळचे मुख्यमंत्री पी विजयन, कर्नाटकचे सिद्धरामय्या, तेलंगणाचे रेवंत रेड्डी, आंध्रचे चंद्राबाबू नायडू, पुद्दुचेरीचे एन रंगास्वामी, पश्चिम बंगालच्या ममता बॅनर्जी आणि भाजपशासित ओडिशाचे मुख्यमंत्री मोहन चरण माझी यांनाही 22 मार्च रोजी चेन्नई येथे होणाऱ्या बैठकीसाठी आमंत्रित केले आहे.
अन्याय होऊ देणार नाही...
एमके स्टॅलिन यांनी या राज्यांतील राजकीय पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांनाही बैठकीसाठी बोलावले आहे. त्यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर लिहिले की, सीमांकन हा संघराज्यवादावरील एक निंदनीय हल्ला आहे. यामुळे संसदेतील आमचा आवाज कमी होतो आणि लोकसंख्या नियंत्रण करणाऱ्या राज्यांना शिक्षा मिळते. हा अन्याय आम्ही होऊ देणार नाही. दरम्यान, पुढील वर्षी तामिळनाडूत विधानसभा निवडणुका आहेत. या पार्श्वभूमीवर एमके स्टॅलिन हिंदी आणि सीमांकनाच्या मुद्द्यावरून केंद्र सरकारला धारेवर धरत आहेत.