दोन मोबाईल आणि मशिदीतील १५ मिनिटे; स्फोट करणाऱ्या उमरच्या हालचालींनी सुरक्षा यंत्रणांची धाकधूक वाढली
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 17, 2025 11:29 IST2025-11-17T11:20:46+5:302025-11-17T11:29:31+5:30
दिल्लीत स्फोट घडवणाऱ्या उमर नबीच्या गायब असलेल्या मोबाईल फोनमुळे या प्

दोन मोबाईल आणि मशिदीतील १५ मिनिटे; स्फोट करणाऱ्या उमरच्या हालचालींनी सुरक्षा यंत्रणांची धाकधूक वाढली
Delhi Blast: गेल्या सोमवारी लाल किल्ल्याजवळ झालेल्या भीषण कार बॉम्ब स्फोटाच्या घटनेने दिल्ली हादरली होती. या स्फोटामागील सूत्रधार डॉ. उमर उन नबी याच्या कारवाया आणि त्याने वापरलेले साहित्य आता तपास यंत्रणांसाठी सर्वात मोठी डोकेदुखी ठरले आहे. या स्फोटामागील अनेक रहस्ये उघड झाली असली तरी, या कटात त्याला मदत करणारे लोक कोण होते आणि त्याने हल्ल्यापूर्वी नेमके काय केले याची उत्तरे तपास यंत्रणांकडून शोधली जात आहेत.
दिल्ली स्पेशल सेल आणि जम्मू-काश्मीर पोलीस यांनी नबीच्या हल्ल्यापूर्वीच्या अखेरच्या ३६ तासांचा मिनिट-दर-मिनिट तपशील गोळा केला आहे. या संपूर्ण तपासात दोन बेपत्ता मोबाईल फोन आणि स्फोटापूर्वी तुर्कमान गेटजवळील मशिदीत नबीने घालवलेली १५ मिनिटे या गोष्टी महत्त्वाच्या ठरल्या आहेत. माध्यमांच्या वृत्तानुसार, डॉ. उमर उन नबीने ३० ऑक्टोबर ते १० नोव्हेंबर या कालावधीत वापरलेले दोन मोबाईल फोन गायब आहेत. महत्त्वाचे म्हणजे, ३० ऑक्टोबर रोजीच नबीचा जवळचा सहकारी डॉ. मुजम्मिल शकील गनई याला अटक झाली होती. याच दिवशी नबीने आपले जुने नंबर डी-अॅक्टिव्हेट केले आणि बनावट कागदपत्रांच्या आधारे दोन नवे नंबर घेतले.
तपास पथकांना हरियाणातील धौज मार्केटमध्ये एका मेडिकल स्टोअरमध्ये नबी दोन फोनसह सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालेला दिसला आहे. अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की, नबीने यापैकी एक फोन सामान्य वापरासाठी आणि दुसरा फोन आपल्या हँडलर्स आणि ऑपरेशनबद्दल बोलण्यासाठी वापरला असावा. "हे दोन्ही फोन सापडले तर, उमर नबीने कोणाच्या सांगण्यावरून आणि कोणाच्या मदतीने हा कट रचला, याचा खुलासा लगेच होईल. हे दोन फोन म्हणजे संपूर्ण कटाची सर्वात महत्त्वाचे आहेत,"
असं अधिकाऱ्यांनी सांगितले.
मशिदीतील 'ती' १५ मिनिटे आणि कोडवर्ड
९ नोव्हेंबरच्या संध्याकाळनंतर मात्र उमर खलीलपुर, रेवासन टोल प्लाझा, फरीदाबाद आणि दिल्लीतील अनेक सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसला, पण तो कोणत्याही कॅमेऱ्यात फोन वापरताना दिसला नाही. त्यामुळे, त्याने हे फोन स्फोटापूर्वी कोणाकडे तरी दिले किंवा स्वतः नष्ट केले असावेत, असा संशय आहे. हल्ल्याच्या काही क्षण आधी नबी तुर्कमान गेटजवळच्या फैज इलाही मशिदीत १५ मिनिटे थांबला होता. मशिदीतील कर्मचाऱ्यांनी सांगितले की, नबीने आपला मास्क उतरवला होता आणि तो तिथे एकटाच फिरत होता. त्याने कोणाशीही संवाद साधला नाही किंवा कोणतीही वस्तू तिथे सोडली नाही. पण तपासकर्त्यांना 'डेटा गॅपमुळे मोठी शंका आहे. एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की त्या १५ मिनिटांत मशिदीत काहीतरी घडले.
या भीतीने तपास पथकाने १० नोव्हेंबरला नबी मशिदीत असताना तिथे आलेल्या लोकांची यादी तयार केली आहे. नबीला मदत करणारा कोणीतरी त्या १५ मिनिटांत तिथे येऊन त्याचे फोन घेऊन गेला असावा, या शक्यतेने त्या सर्व लोकांची कसून चौकशी केली जात आहे. याव्यतिरिक्त, नबी सिम कार्ड्स वारंवार बदलत असे आणि डिलिव्हरी, टेस्टिंग, शिपमेंट अशा कोडवर्डमध्ये बोलत होता, हे मुजम्मिलच्या जप्त केलेल्या फोनमधून स्पष्ट झाले आहे. पोलिसांनी फरीदाबाद, नूह, बल्लभगढ आणि गुरुग्रामच्या सीमेवर मशिदी, भाड्याची घरे आणि कोचिंग सेंटर्समध्ये शोध मोहीम सुरू केली आहे.