Minority workers quit BJP over CAA in Madhya Pradesh | CAA: भाजपाच्या अल्पसंख्याक विभागातील सदस्यांचे राजीनामे; पक्षात भेदभाव होत असल्याचा आरोप

CAA: भाजपाच्या अल्पसंख्याक विभागातील सदस्यांचे राजीनामे; पक्षात भेदभाव होत असल्याचा आरोप

भोपाळ: सुधारित नागरिकत्व कायदा (सीएए) आणि राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी (एनआरसी) यावरुन भाजपामधील अंतर्गत कलह समोर आले आहेत. सध्या देशभरात सीएए आणि एनआरसीविरोधात आंदोलनं सुरू असताना भाजपाच्या अल्पसंख्याक विभागाच्या ४८ सदस्यांनी पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला आहे. पक्षात भेदभावाची वागणूक मिळत असल्याचा आरोप त्यांनी केला. 

एखादं सरकार संसदेत कायदा मंजूर करुन घेत आणि मग घरोघरी जाऊन कायद्यासाठी पाठिंबा मिळवण्याचा प्रयत्न करतं, असं तुम्ही कधी पाहिलंय का?, असा सवाल आदिल खान यांनी उपस्थित केला. खान यांनी नुकताच भोपाळ जिल्ह्याच्या अल्पसंख्याक आघाडीच्या उपाध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. पक्षातले अनेक कार्यकर्ते मुस्लिम समुदायाबद्दल आक्षेपार्ह विधानं करत असल्याचा आरोपदेखील पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिलेल्यांपैकी अनेकांनी केला. 

पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा देताना ४८ जणांनी राज्य भाजपाच्या अल्पसंख्याक प्रदेशाध्यक्षांनादेखील पत्र लिहिलं. एकेकाळी शामाप्रसाद मुखर्जी, अटल बिहारी वाजेपयींच्या तत्त्वांनी चालणारा, भेदभाव न करणारा पक्ष आता पूर्णपणे बदलला आहे. पक्षात लोकशाही राहिलेली नाही. संपूर्ण पक्षावर दोन किंवा तीन नेत्यांचंच वर्चस्व आहे, अशा शब्दांत राजीनामा देताना सदस्यांनी त्यांची नाराजी व्यक्त केली. 

पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा देणाऱ्यांच्या आरोपांवर भाष्य करण्यास भाजपा नेत्यांनी नकार दिला. काँग्रेस आणि कम्युनिस्ट यांच्याकडून दिशाभूल केली जात असल्याचा आरोप भाजपानं केला. देशहिताविरोधात काम करणाऱ्या नेत्यांनी आणि कम्युनिस्टांनी आमच्या कार्यकर्त्यांची दिशाभूल केली. आमच्या कार्यकर्त्यांना चुकीची माहिती देण्यात आली, असा आरोप भाजपा नेते आणि विरोधी पक्षनेते गोपाल भार्गव यांनी केला. 
 

Web Title: Minority workers quit BJP over CAA in Madhya Pradesh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.