राष्ट्रीय महामार्गांवरील स्पीड ब्रेकर्स हटवण्याचा रस्ते वाहतूक मंत्रालयाचा आदेश
By Admin | Updated: April 15, 2016 13:35 IST2016-04-15T12:15:11+5:302016-04-15T13:35:59+5:30
केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालयाने वाहतूक सुरळीत होण्यासाठी तसंच अपघात होण्यासाठी कारणीभूत ठरणा-या स्पीड ब्रेकरला राष्ट्रीय महामार्गांवरुन हटवण्याचा आदेश दिला आहे

राष्ट्रीय महामार्गांवरील स्पीड ब्रेकर्स हटवण्याचा रस्ते वाहतूक मंत्रालयाचा आदेश
>ऑनलाइन लोकमत -
नवी दिल्ली, दि. १५ - केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालयाने स्पीड ब्रेकर्स राष्ट्रीय महामार्गांवरुन हटवण्याचा आदेश दिला आहे.
वाहतूक सुरळीत होण्यासाठी तसंच अपघातांची संख्या कमी करण्यासाठी हा आदेश देण्यात आला आहे. मंत्रालयाने भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (एनएचएआय), राज्यांचे सार्वजनिक बांधकाम मंत्रालय आणि सीमा रस्ते संघटनेला (बीआरओ) हे आदेश दिले आहेत.
रस्ते वाहतूक मंत्रालयाने सर्व विभागांना बुधवारपर्यंत आपल्या कामकाजाची माहिती देण्यास सांगितलं आहे. रस्ते अपघातासंबंधी मंत्रालयाने 2014 मध्ये अहवाल दिला होता. अहवालानुसार 4726 लोकांनी रंगीत पट्ट्यांमुळे (हंप्स) झालेल्या अपघातात आपला जीव गमावला आहे. तर 6672 लोकांचा खड्डे आणि स्पीड ब्रेकरमुळे झालेल्या अपघातांमध्ये मृत्यू झाला आहे.
रस्ते वाहतूक मंत्रालयाने जारी केलेल्या परिपत्रकात स्थानिक प्रशासनावर नाराजी व्यक्त केली आहे. मार्गदर्शक तत्वे जारी केलेली असतानाही वाहनांचा वेग कमी कऱण्यासाठी स्पीड ब्रेकर बांधले जात असल्याचं म्हटलं आहे. यावर मंत्रालयाने आक्षेप घेतला आहे. राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक सुरळीत होणे अपेक्षित असतं. स्पीड ब्रेकरमुळे गंभीर अडथळा होऊन वेगाने जाणा-या वाहनांचा अपघात होऊ शकतो असं मत मंत्रालयाने व्यक्त केलं आहे.
आंतरराष्ट्रीय रस्ते फेडरेशनचे चेअरमन कपिला यांनी हायवेवर स्पीड ब्रेकर नसावेत याचं समर्थन केलं आहे. पण काही हायवे गावातून जातात जिथे लोकांना पलीकडे जाण्यासाठी रस्ता ओलांडावा लागतो. त्यांच्यासाठी सुविधा उपलब्ध करण्याची गरज असल्याचंही कपिला बोलले आहेत.