कर्नाटक राज्याचे नाव बदला, काँग्रेस सरकारच्या मंत्र्याची मोठी मागणी; सुचवलं ऐतिहासिक नाव
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 28, 2023 13:02 IST2023-10-28T13:02:27+5:302023-10-28T13:02:44+5:30
कर्नाटकच्या राजकारणात सध्या शहरांचे नामकरण करण्याचा मुद्दा गाजत आहे.

कर्नाटक राज्याचे नाव बदला, काँग्रेस सरकारच्या मंत्र्याची मोठी मागणी; सुचवलं ऐतिहासिक नाव
कर्नाटकच्या राजकारणात सध्या शहरांचे नामकरण करण्याचा मुद्दा गाजत आहे. विजयपुरा जिल्ह्याचे नाव बदलून १२व्या शतकातील समाजसुधारक बसवेश्वर (बसवण्णा) यांचे नाव देण्याची मागणी होत आहे, असे कर्नाटकचे मंत्री एम.बी. पाटील यांनी शुक्रवारी सांगितले. यासोबतच त्यांनी कर्नाटक राज्याचे नाव बदलून 'बसवा नाडू' ठेवल्यास काहीही गैर होणार नाही असेही सांगितले.
खरं तर उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार यांनी अलीकडेच रामनगर जिल्ह्याचे नाव बदलून 'बंगळुरू दक्षिण' करण्याचा प्रस्ताव मांडला होता. अशातच कर्नाटकचे अवजड आणि मध्यम उद्योगमंत्री एम बी पाटील यांनी राज्याचेच नाव बदलण्याची मागणी केली आहे. यानंतर राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि जेडीएस नेते एचडी कुमारस्वामी यांनी या प्रस्तावाविरोधात बेमुदत उपोषण सुरू करण्याचा इशारा दिला आहे.
विजयपुरा जिल्ह्याचे नाव बदलण्याची मागणी
एम बी पाटील यांनी सांगितले की, सर्वप्रथम या परिसराला विजयपुरा म्हणून ओळखले जात होते. नंतर आदिल शाही राजवटीत ते विजापूर झाले. त्यानंतर पुन्हा एकदा ते विजयपुरा झाले. आता हा जिल्हा बसवेश्वर नावाने ओळखला जावा अशी मागणी अनेकांनी केली आहे. हे साहजिकच आहे कारण हा जिल्हा बसवण्णांची जन्मभूमी आहे आणि त्यात गैर काहीच नाही. खरं तर मंत्री पाटील हे विजयपुरा जिल्ह्यातील बाबलेश्वर विधानसभेचे आमदार आहेत.
"काही तांत्रिक अडचणी आहेत. विजापूरचे विजयपुरा झाले आणि बसवेश्वर झाले तर काही बाबींबाबत गैरसोय होईल. कारण अनेक ठिकाणी नाव बदलावे लागेल...अशा शंका उपस्थित केल्या जात आहेत. त्यामुळे मी मुख्यमंत्र्यांशी याबद्दल बोलेन आणि सर्व बाबींचा विचार करून निर्णय घेऊ", असेही पाटील यांनी नमूद केले. खरं तर २०१४ मध्ये केंद्र सरकारने कर्नाटकच्या राजधानीसह राज्यातील १२ शहरांची नावे बदलण्यास मान्यता दिली होती. त्यानंतर विजापूर हे विजयपुरा म्हणून ओळखले जाऊ लागले.