उत्तर प्रदेशात सत्ताधारी भाजपा आणि विरोधी पक्षातील समाजवादी पक्षासाठी प्रतिष्ठेच्या बनलेल्या मिल्कीपूर विधानसभा मतदारसंघातील सुरुवातीचे कल समोर आले आहेत. यामध्ये भाजपाने समाजवादी पक्षाला धक्का देत आघाडी घेतली आहे. पहिल्या चार फेऱ्यांमधील मतमोजणीनंतर भाजपाचे चंद्रभानू पासवास यांनी समाजवादी पक्षाचे उमेदवार अजित प्रसाद यांच्यावर ११ हजार ६३५ मतांची आघाडी घेतली आहे.
गतवर्षी झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपाची जबर पिछेहाट झाली होती. तसेच उत्तर प्रदेशमध्ये पक्षाला सपा आणि काँग्रेसच्या इंडिया आघाडीकडून दारुण पराभव स्वीकारावा लागला होता. त्यातच अयोध्येतही भाजपाचा उमेदवार पराभूत झाल्याने भाजपावर आणखीनच नामुष्की ओढवली होती. अयोध्येचा ज्या फैजाबाद लोकसभा मतदारसंघात समावेश होतो, तिथून समाजवादी पक्षाचे उमेदवार अवधेश प्रसाद हे विजयी झाले होते. त्यामुळे धक्का बसलेल्या भाजपासाठी अयोध्येजवळील मिल्कीपूर विधानसभा मतदारसंघात होत असलेली पोटनिवडणूक प्रतिष्ठेची बनलेली होती.
अवधेश प्रसाद लोकसभेवर निवडून गेल्याने रिक्त झालेल्या मिल्कीपूर विधानसभा मतदारसंघात समाजवादी पक्षाने अवधेश प्रसाद यांचे पुत्र अजित प्रसाद यांना उमेदवारी दिली होती. तर भाजपाने चंद्रभानू पासवान यांना रिंगणात उतरवले होते. तर चंद्रशेखर आझाद यांच्या आझाद समाज पक्षाने संतोष कुमार यांना उमेदवारी दिली होती.
दरम्यान, आज सुरू असलेल्या मतमोजणीमध्ये पहिल्या फेरीपासूनच भाजपाचे उमेदवार चंद्रभानू पासवान यांचा दबदबा दिसून येत आहे. चंद्रभानू पासवान यांना पहिल्या फेरीत चार हजार मतांची आघाडी घेतली होती. त्यानंतर दुसऱ्या, तिसऱ्या आणि चौथ्या फेरीतही चंद्रभानू पासवान यांनी आघाडी घेत चौथ्या फेरीअखेर आपलं मताधिक्य ११ हजार ६३५ पर्यंत पोहोचवलं आहे.