चीनला प्रत्युत्तर देण्यास सैन्य सक्षम - त्रिवेंद्रसिंह रावत 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 1, 2017 20:05 IST2017-08-01T19:49:53+5:302017-08-01T20:05:38+5:30

चीनने जाणुनबुजून घुसखोरी केली असल्यास त्यांना प्रत्युत्तर देण्यास भारतीय सैन्य सक्षम आहे, असे स्पष्ट मत उत्तराखंडचे मुख्यमंत्री त्रिवेंद्रसिंह रावत यांनी व्यक्त केले.

Military capable to counter China - Uttarakhand Chief Minister Trivandrum Singh Rawat | चीनला प्रत्युत्तर देण्यास सैन्य सक्षम - त्रिवेंद्रसिंह रावत 

चीनला प्रत्युत्तर देण्यास सैन्य सक्षम - त्रिवेंद्रसिंह रावत 

नागपूर, दि. 1 - चीनच्या सैन्याने उत्तराखंडातील बाराहोटी भागात पुन्हा घुसखोरी केल्याचे उघडकीस आल्यामुळे सीमेवर तणाव आणखी वाढला आहे. या घुसखोरीबाबत नेमकी अधिकृत माहिती प्राप्त झालेली नाही. मात्र या भागाचे चिन्हांकन झालेले नसल्यामुळे असे प्रकार घडत असतात. मात्र चीनने जाणुनबुजून घुसखोरी केली असल्यास त्यांना प्रत्युत्तर देण्यास भारतीय सैन्य सक्षम आहे, असे स्पष्ट मत उत्तराखंडचे मुख्यमंत्री त्रिवेंद्रसिंह रावत यांनी व्यक्त केले. मंगळवारी त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयाला भेट दिली व सरसंघचालक डॉ.मोहन भागवत यांची भेट घेतली. याअगोदर त्यांनी प्रसिद्धीमाध्यमांशी संवाद साधला. 
चमोली जिल्ह्यातील बाराहोटी हे गाव असून हा भाग अनेक काळापासून वादग्रस्त आहे. या भागाचे अद्याप चिन्हांकन झालेले नाही. भारत व चीन दोन्ही देशांचे सैनिक तेथे शस्त्र घेऊन जात नाहीत. मात्र या भागात दोन्ही देशातील सैनिक जात असतात. या भागात कुणीही राहत नाही. केवळ सैन्य, ‘आयटीबीपी’चे जवान व पोलीस असतात. चीनकडून चिथावणी देणारी भाषा बोलण्यात येत असेल तर आमचे सैन्यदेखील मजबूत आहे. सेनाध्यक्षांनी तर अगोदरच आपली भुमिका स्पष्ट करुन कुठल्याही आव्हानांचा सामना करण्यासाठी तयार असल्याचे म्हटले होते, याची आठवणदेखील त्यांनी करुन दिली.  

संघ स्वयंसेवक म्हणून भेट 
सरसंघचालकांसोबत भेटीबाबत विचारणा केली असता, मी एक संघ स्वयंसेवक असून नागपूर माझी प्रेरणाभूमी आहे. नागपुरात राष्ट्रीय कर्करोग केंद्राला भेट देण्यासाठी आलो होतो. त्यामुळे सरसंघचालकांना स्वयंसेवक म्हणून भेटणार आहे. उत्तराखंडमध्येदेखील टाटा समूहाच्या मदतीने कर्करोग केंद्र निर्माण करत असल्याची माहिती त्यांनी दिली. 

Web Title: Military capable to counter China - Uttarakhand Chief Minister Trivandrum Singh Rawat