Crime: चाकूचा धाक दाखवून परप्रांतीय कामगाराला मारहाण; पाय चाटण्यास भाग पाडले!
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 7, 2025 15:14 IST2025-11-07T15:12:23+5:302025-11-07T15:14:03+5:30
Surat Migrant Worker Viral Video: या घटनेचा व्हिडीओ सोशल मिडिया व्हायरल झाला असून पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत.

Crime: चाकूचा धाक दाखवून परप्रांतीय कामगाराला मारहाण; पाय चाटण्यास भाग पाडले!
गुजरातच्या सुरत येथून एक धक्कादायक व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आला, ज्यात एका परप्रांतीय कामगारावर मारहाण करण्यात आल्याचे दिसत आहे. तसेच त्याला चाकूचा धाक दाखवून पाय चाटण्यास भाग पाडले. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला असून पुढील तपासाला सुरुवात केली. मात्र, या घटनेमुळे लोकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.
मध्य प्रदेशातील सिद्धी जिल्ह्यातील सुधीर कुमार पांडे असे पीडित व्यक्तीचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना अमरोली परिसरातील एका भोजनालयात घडली , जिथे पांडे काम करत होता. व्हायरल व्हिडीओमध्ये स्वत:ला 'भोला भाई' म्हणून संबोधणारा तरुण पीडित व्यक्तीला मारहाण करत आहे आणि त्याचे पाय चाटण्यास भाग पाडताना दिसत आहे. व्हिडीओमध्ये पीडित व्यक्ती "भोला भाई, मी कधीही सुरतला परत येणार नाही" असे म्हणताना ऐकू येते. आरोपीने या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केल्यानंतर हा प्रकार उजेडात आला. या घटनेनंतर पीडित व्यक्ती भीतीपोटी सुरतहून पळून गेला.
पीडित व्यक्तीने आरोप केला आहे की, कृष्णा यादव आणि भोला यादव या दोघांनी माझ्यावर हल्ला केला. त्याने सांगितले की, “मी सुरतमध्ये कृष्णासोबत काम करायचो, नंतर मी तिथे काम करणे थांबवले आणि दुसऱ्या ठिकाणी राहायला गेलो. जेव्हा मी कृष्णाला फोन करून कळवले, तेव्हा त्यांनी मला एका खोलीत बंद केले आणि मला मारहाण केली. याप्रकरणी सुरत पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून लवकरच आरोपींना अटक केली जाईल. तसेच, व्हिडिओ आणि पीडित व्यक्तीने दिलेल्या साक्षीच्या आधारे तपास पुढे जाईल, अशी माहिती पोलिसांनी दिली.