Meta Apologizes: फेसबुकचे संस्थापक आणि मेटाचे सीईओ मार्क झुकरबर्ग (Mark Zuckerberg) याने अखेर भारताची माफी मागितली आहे. झुकरबर्गने अलीकडेच एका पॉडकास्टमध्ये म्हटले होते की, '2024 हे वर्ष जगासाठी अशांततेने भरलेले होते. कोव्हिडनंतर झालेल्या निवडणुकीत भारतासह अनेक देशांची सरकारे पडली.' या विधानामुळे भारताच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली, अनेक मंत्र्यांनी मार्कवर टीका केली.
मार्क झुकरबर्गच्या टिप्पणीविरोधात संसदीय समितीने मेटाला समन्स बजावले होते. त्यानंतर आता मेटाने माफी मागितली आहे. मेटा इंडियाचे उपाध्यक्ष शिवनाथ ठुकराल यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत याप्रकरणी माफी मागितली. त्यांनी पोस्टमध्ये म्हटले की, '2024 च्या निवडणुकीत अनेक सत्ताधारी पक्ष पुन्हा निवडून आले नाहीत, हे मार्कचे निरीक्षण अनेक देशांसाठी खरे आहे, परंतु भारतासाठी नाही. या अनवधानाने झालेल्या चुकीबद्दल आम्ही माफी मागतो. मेटासाठी भारत हा अतिशय महत्वाचा देश आहे.'
आयटी आणि कम्युनिकेशन प्रकरणांवरील संसदीय समितीचे अध्यक्ष निशिकांत दुबे यांनीदेखील सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर ही माहिती दिली आहे. दुबे आपल्या X पोस्टमध्ये लिहितात, 'भारतीय संसद आणि सरकारला 140 कोटी लोकांचा आशीर्वाद आणि जनतेचा विश्वास आहे. मेटा इंडियाच्या अधिकाऱ्याने आपल्या चुकांसाठी अखेर माफी मागितली आहे. 'हा विजय भारतातील सामान्य नागरिकांचा आहे. पंतप्रधान मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान बनवून जनतेने देशाच्या कणखर नेतृत्वाची ओळख करून दिली आहे. '
काय प्रकरण आहे?फेसबुकचे संस्थापक आणि मेटा सीईओ मार्क झुकरबर्ग यांनी जो रोगनच्या पॉडकास्टमध्ये भारताविषयी चुकीची माहिती दिली होती. ते म्हणाले होते की, 'कोव्हिड-19 नंतर झालेल्या निवडणुकांमध्ये भारतासह जगभरातील अनेक सरकारांचा पराभव झाला आहे. महामारीनंतर लोकांचा आत्मविश्वास कमी झाल्याचे सरकारच्या पराभवावरून दिसून येते.' पण, प्रत्यक्षात मार्क झुकरबर्गचा हा दावा चुकीचा आहे. 2024 मध्ये भारतात झालेल्या निवडणुकीत एनडीएने पुन्हा विजय मिळवला आहे. मार्कच्या या वक्तव्यानंतर अनेक मंत्र्यांनी त्याच्यावर टीका केली. त्याला आयटी आणि कम्युनिकेशन मंत्री अश्विनी वैष्णव यांनीही सोशल मीडियावर उत्तर दिले होते.