कोलकात्यात मेस्सी आला अन्... संतप्त चाहत्यांनी खुर्च्यांचाच फुटबॉल केला!
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 14, 2025 05:58 IST2025-12-14T05:57:52+5:302025-12-14T05:58:09+5:30
स्टेडियमवर प्रचंड तोडफोड, उच्चस्तरीय चौकशी करणार, मुख्य आयोजक ताब्यात

कोलकात्यात मेस्सी आला अन्... संतप्त चाहत्यांनी खुर्च्यांचाच फुटबॉल केला!
कोलकाता: येथील सॉल्ट लेक स्टेडियमवर आयोजित फुटबॉल स्टार लिओनेल मेस्सी याच्या कार्यक्रमात शनिवारी प्रचंड गोंधळ झाला. याप्रकरणी उच्चस्तरीय चौकशीचे आदेश राज्य सरकारने दिले असून कार्यक्रमाच्या मुख्य आयोजकास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी मेस्सीच्या चाहत्यांची जाहीर माफी मागितली आहे.
अर्जेंटिनाचा फुटबॉल विश्वचषक विजेता कप्तान असलेल्या मेस्सीच्या तीन दिवसीय भारत दौऱ्याची सुरुवात शनिवारी कोलकात्यातून झाली. मेस्सीला पाहण्यासाठी हजारो चाहते 'विवेकानंद युवा भारती क्रीडांगणा'वर जमले. मात्र मेस्सी आल्यानंतर त्याला व्हीआयपी, आयोजक व सुरक्षा कर्मचारी यांनी वेढा घातला. त्यामुळे प्रेक्षकांना गॅलरीतून त्याला नीट पाहता आले नाही. त्यामुळे संतप्त प्रेक्षक ओरडत होते. (वृत्तसंस्था)
मेस्सीची एक झलक पाहण्यासाठी मोजले १० हजार रुपये, तरीही निराशाच...; ममता बॅनर्जीनी मागितली चाहत्यांची माफी
१. या गोंधळामुळे मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, शाहरुख खान, सौरव गांगुली यांच्यासह अनेक मान्यवर कार्यक्रमात सहभागी होऊ शकले नाहीत. ममता बॅनर्जी यांनी घटनेबद्दल चाहत्यांची माफी मागितली, तसेच उच्चस्तरीय चौकशीचे आदेश दिले.
२. कोलकाता उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती आशिम कुमार राय यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती स्थापन करण्यात आली आहे. तसेच, या कार्यक्रमाचे मुख्य आयोजक शतद्रू दत्ता यांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे.
३. या कार्यक्रमाच्या तिकिटांचे दर ४,५०० ते ३ १०,००० रुपये इतके प्रचंड होते. अनेकांनी महिन्याच्या पगारातून तिकीट काढल्याचे सांगितले. काळ्याबाजारात तर तिकिटांचे दर २०,००० रुपये होते, असे समजते.
हैदराबादेत खेळला सामना; एक गोलही केला...
कोलकत्यातील गोंधळानंतर मेस्सी हैदराबादला खाना झाला. तिथे उप्पल स्टेडियमवर तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंथ रेड्डी यांच्यासमवेत तो फुटबॉल सामना खेळला. मेस्सीच्या स्वागतासाठी खास म्युझिकल नाइटचेही आयोजन करण्यात आले होते.
मेस्सी आणि राहुल गांधी यांचे चित्र असलेला लेसर शो देखील यावेळी चाहत्यांचे आकर्षण ठरला. काँग्रेस नेते राहुल गांधी देखील यावेळी उपस्थित होते. राहुल गांधी यांनी ताज फलकनुमा पॅलेसमध्ये मेस्सीची भेट घेतली.
मेस्सीने कोलकत्यात त्याच्या ७० फूट उंच पुतळ्याचे व्हर्चुअली उद्घाटन केले. यावेळी बॉलीवूड अभिनेता शाहरुख खान देखील उपस्थित होता.
मेस्सी आज मुंबईत : स्टार फुटबॉलपटू लिओनेल मेस्सी रविवारी मुंबईत येणार आहे. तत्पूर्वी शनिवारी त्याच्या भित्तिचित्राचे अनावरण मुंबईत करण्यात आले.