पैशासाठी तरुणांनी तृतीयपंथीयांसारखे कपडे घातले; खऱ्यांनी पकडून केली जोरदार धुलाई...
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 8, 2025 18:35 IST2025-12-08T18:35:17+5:302025-12-08T18:35:58+5:30
कपडे फाटेपर्यंत लाथा-बुक्क्यांनी मारहाण!

पैशासाठी तरुणांनी तृतीयपंथीयांसारखे कपडे घातले; खऱ्यांनी पकडून केली जोरदार धुलाई...
गुजरातच्या सुरत जिल्ह्यातील सरभोन गावात लग्नसोहळ्यादरम्यान एक विचित्र घटना घडली. नवऱ्या मुलाच्या घरी नेग (शगुन/पैसे) घेण्यासाठी आलेल्या दोन बनावट तृतीयपंथीयांना गावकऱ्यांनी रंगेहात पकडले. गावकऱ्यांनी ही माहिती बारडोलीतील खऱ्या तृतीयपंथीयांना दिली, ज्यांनी तात्काळ घटनास्थळी जाऊन दोघांची जोरदार धुलाई केली. या घटनेचे व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहेत. आरोपी दोन्ही युवक राजकोटचे असल्याचे समोर आले आहे.
लग्नात पैसे घेण्यासाठी दोन युवक ‘किन्नर’ बनून दाखल
सरभोन गावात लग्नाचा माहोल असताना दोन तरुण किन्नरांच्या वेशात पैसे घेण्यासाठी घरात पोहोचले. परंतु गावातील लोकांना स्थानिक किन्नर पूनम मासी आणि इतर खऱ्या किन्नरांची ओळख असल्यामुळे त्यांना संशय आला. पैशाची जास्त मागणी केल्याने शंका आणखी बळावली. गावकऱ्यांनी लगेचच ही माहिती पूनम मासी यांना दिली. सूचना मिळताच पूनम मासी आणि त्यांचे साथीदार सरभोनमध्ये आले. त्यांनी दोन्ही खोट्या किन्नरांना पकडून चौकशी केली.
कपडे फाटेपर्यंत बेदम मारहाण
चौकशीत दोघांनीच कबूल केले की, ते राजकोटचे आहेत आणि पैशासाठी किन्नरांप्रमाणे वेशांतर करून पैसे गोळा करण्यासाठी आले होते. यावेळी बनावट किन्नरांना जमावासमोर बसवून खऱ्या किन्नरांनी त्यांना लाथा-बुक्क्यांनी जोरदार मारहाण केली. एवढेच नाही, त्यांच्या अंगावरील कपडेदेखील फाडण्यात आले. या मारहाणीचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या दोन तरुणांनी शेवटी हात जोडून माफी मागितली.