मेहुल चोकसी आता अँटिग्वामधूनही झाला फरार, परराष्ट्र मंत्र्यांनी दिली माहिती
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2025 17:33 IST2025-03-19T17:33:14+5:302025-03-19T17:33:49+5:30
Mehul Choksi News: पंजाब नॅशनस बँकेमध्ये झालेल्या कोट्यवधीच्या घोटाळ्याप्रकरणी भारतीय तपास यंत्रणांना हवा असलेला आरोपी मेहुल चोकसी हा अँटिग्वामधूनही फरार झाला आहे.

मेहुल चोकसी आता अँटिग्वामधूनही झाला फरार, परराष्ट्र मंत्र्यांनी दिली माहिती
पंजाब नॅशनस बँकेमध्ये झालेल्या कोट्यवधीच्या घोटाळ्याप्रकरणी भारतीय तपास यंत्रणांना हवा असलेला आरोपी मेहुल चोकसी हा अँटिग्वामधूनही फरार झाला आहे. भारतीय तपास यंत्रणांनी त्याचा शोध घेण्यास सुरुवात केल्यावर तो अँटिग्वामध्ये पळून गेला होता. तसेच तिथून तो भारतीय यंत्रणांना हुलकावणी देत होता. अखेरीस आता तो तिथूनही पसार झाला आहे.
याबाबतची माहिती अँटिग्वा आणि बरबुडाचे परराष्ट्रमंत्री चॅग ग्रीन यांनी दिली आहे. त्यांनी सांगितले की, मेहुल चोकसी हा आता अँटिग्वामध्ये नाही आहे. मेहुल चोकसी हा उपचारांसाठी अन्यत्र कुठेतरी गेला आहे. या प्रकरणी सर्व कायदेशीर प्रक्रियांचं पालन केलं जाणार आहे.
भारत सरकारला आश्वासन देताना अँटिग्वाच्या मंत्र्यांनी सांगितलं की, या प्रकरणात कुठलंही कपट कारस्थान होणार नाही. आमच्या देशाची नागरिकत्व योजना ही विश्वसनीय आहे. तसेच त्यामध्ये विविध स्तरांवर पडताळणी केली जाते. याबाबत एक दोन वेळा प्रश्न उपस्थित झाले होते. मात्र मेहुल चोकसीच्या बाबतीत सर्व नियमांचं पालन करण्यात आलेलं होतं.
त्यांनी पुढे सांगितलं की, चोकसीला नागरिकत्व दिलं गेलं तेव्हा त्याने भारत किंवा इतर कुठल्याही देशातील कायद्यांचं उल्लंघन केल्याची बाब समोर आलेली नव्हती. नंतर निर्माण झालेली परिस्थिती हा आमच्या कायद्यांमधील उणीव नाही तर वेळेचा खेळ आहे, अँटिग्वा सरकार सर्व मित्र देशांसोबत मिळून काम करत राहील.