अरे देवा! हातावर उत्तराची मेहंदी अन् नखांवर फॉर्म्युले: कॉपी करण्याची पद्धत पाहून शिक्षक हैराण
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2022 11:58 IST2022-04-15T11:52:51+5:302022-04-15T11:58:49+5:30
विद्यार्थांचा कारनामा पाहायला मिळत आहे. परीक्षेत कॉपीसाठी मुलांनी शोधलेली पद्धत पाहून सर्वच शॉक झाले आहेत.

अरे देवा! हातावर उत्तराची मेहंदी अन् नखांवर फॉर्म्युले: कॉपी करण्याची पद्धत पाहून शिक्षक हैराण
नवी दिल्ली - कॉपी करण्याचे अनेक भन्नाट प्रकार हे दरवर्षी उघडकीस येत असतात. कॉपी करण्यासाठी विद्यार्थी विविध पद्धतींचा अवलंब करतात. कधी कागद, कधी कपडे तर कधी बेंचवर प्रश्नांची उत्तरं लिहून कॉपी केली जात होती. अशीच एक अजब घटना समोर आली असून विद्यार्थांचा कारनामा पाहायला मिळत आहे. परीक्षेत कॉपीसाठी मुलांनी शोधलेली पद्धत पाहून सर्वच शॉक झाले आहेत. मेरठमधील घटनेची सध्या जोरदार चर्चा रंगली आहे. हातावर उत्तराची मेहंदी अन् नखांवर फॉर्म्युले लिहिलेल्या विद्यार्थ्यांना पाहून शिक्षक हैराण झाले आहेत. या घटनेने सर्वांनाच धक्का बसला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मेरठमधल्या चौधरी चरणसिंग विद्यापीठाशी संलग्न असलेल्या महाविद्यालयांमध्ये परीक्षा सुरू असताना एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. तिथले विद्यार्थी कॉपी करण्यासाठी आता इलेक्ट्रॉनिक उपकरणांऐवजी नखांचा आणि हातांचा वापर करत आहेत. हे विद्यार्थी नखांवर फॉर्म्युला लिहीत असल्याचं स्पष्ट झालं आहे. बरेच विद्यार्थी त्यांच्या हातावर अशा प्रकारे कॉपी लिहितात पण लांबून पाहिलं तर मेहंदी काढल्यासारखं वाटतं. नीट तपासणी केल्यानंतर हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.
कॉपी करण्याच्या या पद्धती पाहून शिक्षक देखील आश्चर्यचकित झाले आहेत. मेरठमधल्या महाविद्यालयांमधून आतापर्यंत कॉपी करणाऱ्या 250 विद्यार्थ्यांना पकडण्यात आलं आहे. विशेष म्हणजे एका छोट्या नखावर हे विद्यार्थी आठ ओळींमध्ये प्रश्न आणि उत्तरं लिहीत होते. एवढंच नाही, तर कॉपी करणाऱ्या एका विद्यार्थ्याने हातावर मेहंदीचं डिझाइन वाटावं अशा पद्धतीनं कॉपी लिहून आणली होती. परंतु कॉपीबहाद्दराच्या प्रयत्नांना यश आलं नाही.
कॉपीचे प्रकार रोखण्यासाठी तयार करण्यात आलेल्या मोबाइल टीमचे समन्वयक डॉ. शिवराजसिंह पुंडिर यांनी दिलेल्या माहितीनुसार, "यापूर्वी विद्यार्थी, विद्यार्थिनी हायटेक तंत्रज्ञानाचा वापर करून कॉपी करायचे. हे विद्यार्थी मोबाईलचे ब्लूटूथ चालू करून परीक्षा केंद्रांवर जात असत. त्यामुळे डिव्हाइस सापडत असत. परंतु, आता कॉपीसाठी पुन्हा छोट्या कागदांचा वापर सुरू झाल्याचं दिसून येत आहे. नखांवर कॉपी लिहिणं हा माझ्या पाहण्यातला पहिलाच प्रकार आहे. कॉपी करणाऱ्यांना पकडण्यासाठी सीसीटीव्हीच्या माध्यमातून नजर ठेवली जात आहे." एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.