भयंकर! अचानक लिफ्ट बंद पडली, आवाज देण्यासाठी डोकं बाहेर काढताच...; व्यावसायिकाचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 27, 2025 08:29 IST2025-07-27T08:29:07+5:302025-07-27T08:29:44+5:30
इंडियन स्पोर्ट्स कंपनीचे मालक हरविंदर सिंग उर्फ पिंटू यांचा मृत्यू झाला.

फोटो - ABP News
उत्तर प्रदेशातील मेरठमधील सूरजकुंड परिसरात शनिवारी संध्याकाळी एक धक्कादायक घटना घडली आहे. इंडियन स्पोर्ट्स कंपनीचे मालक हरविंदर सिंग उर्फ पिंटू यांचा मृत्यू झाला. मिळालेल्या माहितीनुसार, हरविंदर सिंग त्यांच्या फॅक्ट्रीमध्ये पहिल्या मजल्यावरून दुसऱ्या मजल्यावर जात होते, त्यादरम्यान त्यांची मान लिफ्टमध्ये अडकली. गंभीर जखमी अवस्थेत त्यांच्या कुटुंबियांनी त्यांना उपचारासाठी तातडीने एका खासगी रुग्णालयात नेलं, जिथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. पोलीस या प्रकरणाची चौकशी करत आहेत.
घटनास्थळी उपस्थित असलेले कर्मचारी सुरेंद्र सिंग यांनी दिलेल्या माहितीनुसार, घटनेच्या वेळी ते तिथे उपस्थित होते. संध्याकाळी सर्वांची घरी जाण्याची वेळ झाली होती, तेव्हा हरविंदर सिंग दुसऱ्या मजल्यावर जात होते, तेव्हा अचानक लिफ्ट बंद पडली. हरविंदर सिंग यांनी आवाज देण्यासाठी लिफ्टमधून डोकं बाहेर काढताच लिफ्ट पुन्हा सुरू झाली.
याच दरम्यान, हरविंदर सिंग यांची मान लिफ्टमध्ये अडकली. त्यानंतर ते गंभीर जखमी झाले. उपचारासाठी त्यांना रुग्णालयात नेण्यात आलं. जिथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले. घटनास्थळाची पाहणी केल्यानंतर पोलिसांनी मृतदेह पोस्टमॉर्टेमसाठी पाठवला आहे. पोलिसांच्या प्राथमिक तपासात, लिफ्टच्या सुरक्षा व्यवस्थेतील त्रुटीमुळे ही दुर्घटना झाल्याचं सांगितलं जात आहे.
या घटनेबाबत मेरठ पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितलं की, सदर घटनेच्या सर्व पैलूंची चौकशी केली जात आहे. तसेच लिफ्टची स्थिती आणि तांत्रिक सुरक्षा मानकांची देखील तपासणी केली जाईल. पोस्टमॉर्टेम अहवालानंतरच मृत्यूचे नेमकं कारण समोर येईल. सध्या या प्रकरणात कारवाई सुरू आहे.