भारतीय तटरक्षक दलासाठी पाकिस्तानने काहीकाळ समुद्री सीमा खुली केली, असे काय घडले...
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2024 09:29 IST2024-12-05T09:29:11+5:302024-12-05T09:29:26+5:30
पाकिस्तानी एजन्सीला मुंबईच्या एमआयसीसीकडून मेल पाठविण्यात आला होता. यामध्ये बुडालेल्या जहाजावरील लोकांचा शोध घेणे आणि त्यांना वाचविण्यासाठी मदत करण्याची विनंती करण्यात आली होती, असे पीएमएसएने म्हटले आहे.

भारतीय तटरक्षक दलासाठी पाकिस्तानने काहीकाळ समुद्री सीमा खुली केली, असे काय घडले...
कित्येक दशकांचे वैर असले तरी पाकिस्तानने बुडणाऱ्या भारतीय जहाजावरील खलाशांना वाचविले आहे. भारतीय मालवाहक जहाज पाकिस्तानी समुद्र हद्दीत बुडाले आहे. या जहाजावरील संकटात सापडलेल्या १२ भारतीय खलाशांना पाकिस्तान समुद्री सुरक्षा एजन्सीने वाचविले आहे.
पाकिस्तानी एजन्सीला मुंबईच्या एमआयसीसीकडून मेल पाठविण्यात आला होता. यामध्ये बुडालेल्या जहाजावरील लोकांचा शोध घेणे आणि त्यांना वाचविण्यासाठी मदत करण्याची विनंती करण्यात आली होती, असे पीएमएसएने म्हटले आहे.
एमएसव्ही अल पिरानिपीर हे मालवाहू जहाज पाकिस्तानच्या विशेष आर्थिक क्षेत्रात बुडाले होते. यामुळे या जहाजावरील १२ खलाशी संकटात सापडले होते. पाकिस्तानी एजन्सीने अन्य एजन्सींसोबत मिळून बचाव कार्य सुरु केले. पीएमएसएने लगेचच एक जहाज पाठवत खलाशांचा शोध घेण्याचे काम दिले. तर इतर मालवाहू जहाजांना सतर्क करण्यात आले, तसेच बचाव कार्यात मदत करण्यास सांगण्यात आले.
सूचना मिळताच पाकिस्तानी नौदलाने देखील आपले जहाज त्या दिशेने रवाना केले. १२ खलाशांना वाचविल्यानंतर भारतीय तटरक्षक दलाच्या जहाजाला या खलाशांना भारतात आणण्यासाठी पाकिस्तानी हद्दीत प्रवेश करण्याची परवानगीही देण्यात आली होती. दोन्ही देशांच्या समन्वयातून खलाशांना सुखरूप भारतात आणण्यात आले आहे.