Fazilka Border BSF Seizes Arms: कडाक्याची थंडी आणि दाट धुक्याचा फायदा घेऊन भारतीय सीमेत घुसखोरी करणाऱ्या पाकिस्तानी तस्करांचे मनसुबे सीमा सुरक्षा दलाने मातीस मिळवले आहेत. पंजाबच्या फाजिल्का आणि अमृतसर सीमेवर राबवलेल्या मोठ्या मोहिमेत सुरक्षा दलांनी शस्त्रास्त्रांचा मोठा साठा आणि कोट्यवधी रुपये किमतीचे हेरॉईन जप्त केले आहे. या कारवाईदरम्यान एका घुसखोराला कंठस्नान घालण्यात यश आले आहे.
६० फेऱ्या झाडल्या, तस्कर पळाले
फाजिल्का जिल्ह्यातील आंतरराष्ट्रीय सीमेवरील बीओपी जी-जी-३ परिसरात गुरुवारी मध्यरात्री पाकिस्तानी तस्करांच्या हालचाली दिसल्या. हे तस्कर दोन मोठ्या बॅगांमधून शस्त्रे आणि ड्रग्जची खेप भारतात पाठवण्याच्या तयारीत होते. सतर्क बीएसएफ जवानांनी त्यांना पाहताच जोरदार गोळीबार सुरू केला. जवानांनी तब्बल ६० राउंड फायरिंग केल्यामुळे तस्कर घाबरून अंधाराचा फायदा घेत पुन्हा पाकिस्तानच्या दिशेने पळून गेले.
काय काय सापडले?
सर्च ऑपरेशनमध्ये जवानांच्या हाती परदेशी शस्त्रास्त्रांचा मोठा साठा लागला आहे. यामध्ये ११ ग्लॉक, ५ जिगाना, ३ नॉरिंको आणि १ बरेटा अशा एकूण २० पिस्तुल आहेत. ३९ मॅगझिन, १ गन आणि ३१० जिवंत काडतुसे देखील जप्त करण्यात आली आहेत. तसेच २ किलो १६० ग्रॅम हेरॉईन ताब्यात घेण्यात आलं आहे.
अमृतसरमध्ये ४० किलो हेरॉईन आणि हँड ग्रेनेड जप्त
दुसरीकडे अमृतसरच्या राजासांसी भागातील ओठियां गावाजवळ पोलिसांनी मोठी कारवाई केली. ड्रोनच्या साहाय्याने पाकिस्तानातून पाठवण्यात आलेले ४० किलो हेरॉईन आणि ४ हँड ग्रेनेड जप्त करण्यात आले आहेत. काही तरुण मोटारसायकलवरून ही खेप घेऊन जात होते, मात्र गावकरी आणि रस्ते कामगारांनी अडवल्यामुळे ते मोटारसायकल सोडून पसार झाले.
गुरदासपूरमध्ये घुसखोर ठार
गुरदासपूरच्या बीओपी धनिया भागात कडाक्याच्या थंडीत भारतीय सीमा ओलांडून आत शिरणाऱ्या पाकिस्तानी घुसखोराला बीएसएफच्या ११३ बटालियनने कंठस्नान घातले. वारंवार इशारा देऊनही तो मागे न फिरल्याने जवानांनी गोळीबार केला, ज्यामध्ये तो जागीच ठार झाला.
पंजाबचे पोलीस महासंचालक गौरव यादव यांनी या मोहिमेची माहिती सोशल मीडियावर दिली आहे. बीएसएफ आणि पंजाब पोलिसांच्या स्टेट स्पेशल ऑपरेशन सेलने संयुक्तपणे हे जाळे उध्वस्त केले असून, आता या तस्करीच्या मास्टरमाईंडचा शोध घेतला जात आहे.
Web Summary : BSF foiled a Pakistan smuggling plot in Punjab, seizing arms, drugs, and eliminating a trespasser. Operations in Fazilka and Amritsar yielded weapons, heroin, and hand grenades. A smuggler was killed in Gurdaspur.
Web Summary : बीएसएफ ने पंजाब में पाकिस्तान की तस्करी की साजिश को नाकाम कर दिया, हथियार, ड्रग्स जब्त किए, और एक घुसपैठिए को मार गिराया। फाजिल्का और अमृतसर में हथियारों, हेरोइन और हथगोले बरामद। गुरदासपुर में एक तस्कर मारा गया।