लाल किल्ल्याजवळ कारचा भीषण स्फोट, ८ ठार; 'प्रत्येक अँगलने तपास करा', गृहमंत्री अमित शाह यांचे तातडीचे आदेश!
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 10, 2025 22:16 IST2025-11-10T22:16:03+5:302025-11-10T22:16:20+5:30
दिल्लीतील लाल किल्ल्याजवळ झालेल्या भीषण स्फोटानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी तातडीने परिस्थितीची माहिती घेतली.

लाल किल्ल्याजवळ कारचा भीषण स्फोट, ८ ठार; 'प्रत्येक अँगलने तपास करा', गृहमंत्री अमित शाह यांचे तातडीचे आदेश!
देशाच्या राजधानीत सोमवारी सायंकाळी लाल किल्ला मेट्रो स्टेशनच्या अगदी जवळ झालेला भीषण स्फोट अत्यंत गंभीर वळणावर पोहोचला आहे. सुभाष मार्ग ट्रॅफिक सिग्नलजवळ उभ्या असलेल्या ह्युंदाई आय२० कारमध्ये झालेल्या या स्फोटात आतापर्यंत ८ जणांचा मृत्यू झाल्याची पुष्टी झाली असून, अनेक जण जखमी आहेत. या घटनेनंतर केंद्रातील उच्च पातळीवर तातडीच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.
गृहमंत्री अमित शाह यांची प्रतिक्रिया
या भीषण स्फोटानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी तातडीने परिस्थितीची माहिती घेतली. त्यांनी सांगितले की, सायंकाळी ७ च्या सुमारास सुभाष मार्ग ट्रॅफिक सिग्नलजवळ हा स्फोट झाला, ज्यात काही पादचारी जखमी झाले आणि वाहनांचे नुकसान झाले.
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह म्हणाले, "आज संध्याकाळी, अंदाजे ७ वाजता, दिल्लीतील लाल किल्ल्याजवळ सुभाष मार्ग ट्रॅफिक सिग्नलवर एका ह्युंदाई आय२० कारमध्ये स्फोट झाला. या स्फोटात काही पादचारी जखमी झाले आणि काही वाहनांचे नुकसान झाले. प्राथमिक अहवालांनुसार, काही लोकांचा जीव गेला आहे. स्फोटाची माहिती मिळाल्यापासून १० मिनिटांच्या आत, दिल्ली क्राईम ब्रांच आणि दिल्ली स्पेशल ब्रांचचे पथक घटनास्थळी पोहोचले. एनएसजी आणि एनआयएच्या पथकांनी, एफएसएलसोबत मिळून, आता सखोल तपास सुरू केला आहे. आजूबाजूच्या सर्व सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची तपासणी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. मी दिल्लीचे पोलीस आयुक्त आणि स्पेशल ब्रांचचे प्रभारी यांच्याशीही बोललो आहे. दिल्लीचे आणि स्पेशल ब्रांचचे प्रभारी घटनास्थळी उपस्थित आहेत. आम्ही सर्व शक्यतांचा शोध घेत आहोत आणि सर्व शक्यता विचारात घेऊन सखोल तपास करू. या प्रकरणाची त्वरित चौकशी केली जाईल आणि आम्ही लवकरच जनतेसमोर त्याचे निष्कर्ष सादर करू. मी थोड्याच वेळात घटनास्थळी आणि त्यानंतर तातडीने रुग्णालयात भेट देण्यासाठी रवाना होत आहे."
#WATCH | Delhi: Blast near Red Fort Metro Station | Union Home Minister Amit Shah says "This evening, around 7 pm, a blast occurred in a Hyundai i20 car at the Subhash Marg traffic signal near the Red Fort in Delhi. The blast injured some pedestrians and damaged some vehicles.… pic.twitter.com/BfRei3r3tx
— ANI (@ANI) November 10, 2025
घटनेची माहिती मिळताच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही गृहमंत्री अमित शाह यांना फोन करून दिल्लीतील परिस्थिती आणि तपासकार्याची माहिती घेतली.
दरम्यान, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी तातडीने एलएनजेपी रुग्णालयात धाव घेतली आणि स्फोटात जखमी झालेल्या नागरिकांची भेट घेऊन त्यांची विचारपूस केली. स्फोटामुळे राजधानीत निर्माण झालेली ही दहशत आणि ११ जणांचा बळी घेतल्याच्या घटनेने देशाच्या सुरक्षिततेवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.