मर्दानी! पतीला वाचवण्यासाठी महिलेने अस्वलांशी केले दोन हात
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 13, 2021 16:43 IST2021-09-13T16:43:20+5:302021-09-13T16:43:38+5:30
Interesting News: छत्तीसगडमधील कोरबा येथून एक विचित्र घटना समोर आली आहे. येथे पतीला वाचवण्यासाठी पत्नने अस्वलाशी दोन हात केले. ही घटना कोरबा वनक्षेत्रातील लेमरू रंजच्या गाव अलगीडोंगरी येथील आहे.

मर्दानी! पतीला वाचवण्यासाठी महिलेने अस्वलांशी केले दोन हात
रायपूर - छत्तीसगडमधील कोरबा येथून एक विचित्र घटना समोर आली आहे. येथे पतीला वाचवण्यासाठी पत्नने अस्वलाशी दोन हात केले. ही घटना कोरबा वनक्षेत्रातील लेमरू रंजच्या गाव अलगीडोंगरी येथील आहे. सदर महिलेवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पतीला वाचवण्यासाठी अस्वलांचा सामना करणाऱ्या या महिलेचे नाव ईतवारी बाई असे आहे.
ईतवारी बाईच्या बकऱ्या जंगलात चरण्यासाठी गेल्या होत्या. मात्र त्या परत आल्या नाहीत. त्यामुळे त्यांना शोधण्यासाठी ईतवारी बाई पती पवित्तर सिंह याच्यासोबत जंगलात गेली. या दरम्यान, जंगलातील झुडपांमधून दोन अस्वलांनी ईतवारी बाईच्या पतीवर हल्ला केला. पतीचे प्राण संकटात असल्याचे पाहून ईतवारी बाईने हिंमत करून अस्वलांवर जोरदार प्रतिहल्ला केला. मात्र अस्वलांशी लढताना ईतवारी बाई गंभीर जखमी झाली.
तिची अवस्था पाहून संजीवनी १०८ एक्स्प्रेस बोलावून रुग्णालयात पाठवले. ईतवारी बाईच्या मुलीने सांगितले की, तिला वन विभागाकडून कुठल्याही प्रकारची आर्थिक मदत मिळालेली नाही. या घटनेच्या अनेक तासांनंतरही मदत मिळत नसल्याने अनेक अडचणींचा सामना करावा लागला.