लग्न अविस्मरणीय बनवण्यासाठी लोक सर्वतोपरी प्रयत्न करतात. उत्तर प्रदेशच्या कानपूर देहात जिल्ह्यात एक असा विवाह झाला आहे जो संस्मरणीय ठरला आणि तो अविस्मरणीय बनवण्यासाठी वधू-वरांनी असा अनोखा संकल्प केला ज्याने सगळ्यांचीच मनं जिंकली. विवाहाच्या अतूट बंधनात बांधलेल्या जोडप्याने लग्नादरम्यान ११ गरीब मुलांना त्यांच्या पूर्ण शिक्षणासाठी दत्तक घेऊन पुढाकार घेतला आहे.
नवदाम्पत्याने मुलांना लग्नाच्या मंचावर आपल्यासह बसवलं आणि त्याच्यासोबतचे फोटो काढले. कानपूर देहातच्या सिकंदरा भागात राहणाऱ्या दीक्षा यादवचं लग्न ठरलं होतं. तिला तिच्या लग्नात समाजासाठी असं काहीतरी करायचं होतं ज्यामुळे तिचं लग्न कायम संस्मरणीय ठरेल. स्वयंसेवी संस्था चालवणाऱ्या दीक्षा यादवला समाजासाठी काहीतरी नवीन करण्याची इच्छा आहे.
लग्नापूर्वी, दीक्षाने तिच्या पतीच्या संमतीने, चांगले शिक्षण मिळावं म्हणून परिसरातील ११ मुलांना दत्तक घेतलं. दीक्षाने सर्व ११ मुलांना दत्तक घेऊन त्यांच्या संपूर्ण शिक्षणाची जबाबदारी घेतली. त्यांच्या या पुढाकाराने समजात सर्वाना संदेश दिला आणि त्यांच्या लग्नाला उपस्थित असलेल्या सर्वांनी त्यांच्या कृत्तीचं खूप कौतुक केलं.
दीक्षाने म्हटलं की, आपण नेहमी स्वतःचा आणि आपल्या प्रियजनांचा विचार करतो पण समाजात जी माणसं मुलभूत सुविधांपासून वंचित आहेत ती सुद्धा आपलीच आहेत, आपण लाखो-करोडो खर्च करतो पण त्याच खर्चातून आपण काही पैसे त्यांच्यासाठी खर्च करू. माझ्या पतीची संमती घेऊन हा निर्णय घेतला आहे. त्यांच्या या निर्णयांचं सर्वत्र कौतुक होत आहे.