मोर्चे, निदर्शने अन् वाद अधिक गाजले; अधिवेशन गदारोळातच ‘गारठले’, संसद संस्थगित
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 21, 2024 06:04 IST2024-12-21T06:03:11+5:302024-12-21T06:04:20+5:30
संसद प्रवेशद्वार, परिसरात धरणे-निदर्शने केली तर कारवाई; लोकसभा अध्यक्षांची तंबी

मोर्चे, निदर्शने अन् वाद अधिक गाजले; अधिवेशन गदारोळातच ‘गारठले’, संसद संस्थगित
हरिश गुप्ता, लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली : संसदेच्या प्रवेशद्वारावर गुरुवारी सत्ताधारी व विरोधी पक्षांच्या खासदारांत झालेल्या धक्काबुक्कीच्या पार्श्वभूमीवर लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनी शुक्रवारी खासदारांना कडक शब्दांत इशारा दिला. संसदेच्या कोणत्याही प्रवेशद्वारावर किंवा परिसरात अशी धरणे-निदर्शने केली तर यापुढे कडक कारवाई केली जाईल, असे बिर्ला यांनी बजावले. या कारवाईचे स्वरूप काय असेल हे मात्र त्यांनी स्पष्ट केले नाही. हिवाळी अधिवेशनाचे शुक्रवारी सूप वाजले. लोकसभा व राज्यसभेची कार्यवाही अनिश्चित काळासाठी संस्थगित करण्यात आली. २६ नोव्हेंबरला संसदेचे हे अधिवेशन सुरू झाले होते.
सकाळी लोकसभेत कार्यवाही सुरू झाल्यानंतर कायदा मंत्री अर्जुन मेघवाल यांनी ‘एक देश-एक निवडणूक’ विधेयक संसदेच्या संयुक्त समितीकडे पाठवण्याचा प्रस्ताव मांडला आणि सभागृहांनी त्याला मंजुरी दिली. यानंतर बोलताना अध्यक्ष बिर्ला यांनी सदस्यांना आंदोलनांबाबत इशारा दिला. गुरुवारी संसदेच्या मकर द्वारवर झालेल्या या गोंधळात भाजपचे दोन खासदार जखमी झाले होते, तर काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेही कोसळले हाेते. ‘संसदेची प्रतिष्ठा आणि परंपरा जपणे ही सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे. या इमारतीच्या कोणत्याही प्रवेशद्वारावर आंदोलने करणे योग्य नाही’, असे बिर्ला यांनी सुनावले.
विरोधी आघाडीचा मोर्चा : काँग्रेससह विरोधी पक्षांच्या ‘इंडिया’ आघाडीने शुक्रवारी राजधानीत विजय चौकातून संसदेपर्यंत मोर्चा काढला. गृहमंत्री अमित शाह यांच्या कथित वक्तव्याच्या निषेधार्थ राजीनाम्याची मागणी करीत हाती डॉ. आंबेडकर यांचे पोस्टर्स घेऊन घोषणाबाजीही केली.
प्रियांकांना दिली ‘१९८४’ बॅग : भाजप खासदार अपराजिता सारंगी यांनी काँग्रेस खासदार प्रियांका गांधी यांना लाल रंगाची ‘१९८४’ असे लिहिलेली बॅग भेट दिली. पॅलेस्टाइन आणि बांगलादेश असे लिहिलेल्या बॅग हातात घेऊन प्रियांका संसदेत दाखल झाल्या होत्या. त्या पार्श्वभूमीवर त्यांना सांकेतिक अर्थाने हे वर्ष नमूद करून बॅग देण्यात आली.
लोकसभेत होऊ शकले ५७.८७ टक्केच कामकाज
संसदेच्या हिवाळी अधिवेशनात विविध मुद्द्यांवरून झालेल्या गदारोळामुळे लोकसभेत फक्त ५७.८७ टक्केच काम झाले आहे. अदानी उद्योगसमूहावर झालेले आरोप, अब्जाधीश जॉर्ज सोरोससोबत लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी व काँग्रेसच्या अन्य नेत्यांचे असलेले कथित संबंध, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा अवमान करणारे उद्गार केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी काढल्याचा झालेला आरोप अशा गोष्टींमुळे संसदेत गदारोळामुळे सभागृह बऱ्याचदा तहकूब करावे लागले होते. हिवाळी अधिवेशनात २५ नोव्हेंबरला लोकसभेचे कामकाज सुरू झाले व शुक्रवारी लोकसभा, राज्यसभा पुढील अधिवेशनापर्यंत संस्थगित करण्यात आले. लोकसभा व विधानसभा निवडणुका एकत्रितरीत्या घेण्याबद्दलचे विधेयक व त्याच्याशी निगडित अन्य एक विधेयक लोकसभेत हिवाळी अधिवेशनात मांडण्यात आली.
चालू अधिवेशनात असे झाले कामकाज
- ‘एक देश एक निवडणूक’ विधेयक सरकारने मांडले. ते संसदेच्या संयुक्त समितीकडे पाठवण्यास मंजुरी देण्यात आली.
- बड्या उद्योजकावरून सरकारवर झालेले आरोप तसेच संभलमधील हिंसाचाराच्या मुद्द्यावर सभागृहांत प्रचंड गोंधळ झाला. त्यामुळे अनेकदा कार्यवाही तहकूब करण्यात आली.
- संसदेच्या ७५ वर्षांच्या गौरवपूर्ण प्रवासावर चर्चेसाठी विरोधकांनी सरकारला राजी केले. शेवटी दोन दिवसीय चर्चेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तर दिले.
- बांगला देशातील हिंदूंच्या स्थितीबाबत संसदेत आक्रमक चर्चा झाली. बड्या उद्योजकावर अमेरिकेतील कारवाईसंदर्भात विरोधकांनी सरकारला घेरले.
- ‘एक देश एक निवडणूक’ विधेयक मांडताना नव्या संसद भवनात प्रथमच इलेक्ट्रॉनिक पद्धतीने मतविभागणी.
या अधिवेशनातील कामकाजाचा ताळेबंद
लोकसभा : एकूण २० बैठका झाल्या. ६२ तास कामकाज झाले. लाेकसभेत पाच दुरुस्ती विधेयके तर चार नवी विधेयके मंजूर करण्यात आली. शून्यकाळात जनतेच्या दृष्टीने महत्त्वाचे १८२ प्रश्न चर्चेला आले.
राज्यसभा : या सभागृहात एकूण ४३.२७ तास कामकाज झाले. दोन विधेयके मंजूर करण्यात आली. भारत-चीन संबंधांवर परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी उत्तर दिले.