Marathi is not a regional but a national language - Ashok Vajpayee | मराठी ही प्रादेशिक नव्हे, तर राष्ट्रीय भाषाच आहे - अशोक वाजपेयी
मराठी ही प्रादेशिक नव्हे, तर राष्ट्रीय भाषाच आहे - अशोक वाजपेयी

- नितीन नायगावकर

नवी दिल्ली : मराठी, तामिळ, बंगाली यांना प्रादेशिक भाषा म्हणणे योग्य नाही. त्या राष्ट्रीय भाषाच आहेत. मराठीचेच उदाहरण द्यायचे झाले, तर महाराष्ट्रासह गुजरात, गोवा, धारवाड, उत्तर प्रदेश, मध्यप्रदेशातही ती बोलली जाते. त्यामुळे माझ्या दृष्टीने सर्व प्रादेशिक भाषा राष्ट्रीय भाषाच आहेत, असे स्पष्ट मत प्रख्यात विचारवंत व हिंदी कवी अशोक वाजपेयी यांनी ‘लोकमत’च्या मुलाखतीत व्यक्त केले. व्यवस्थेकडून विविध स्तरांवर प्रादेशिक भाषांची गळचेपी सुरू असल्याच्या पार्श्वभूमीवर संस्कृत, प्रादेशिक भाषा, अनुवाद आदी विषयांवर त्यांनी प्रकाश टाकला.

प्रादेशिक भाषांचे महत्त्व कमी करण्याचा प्रयत्न होतोय का?
अलीकडेच भाषातज्ज्ञ गणेश देवी यांच्या नेतृत्वाखाली भारतीय भाषांचे लोकसर्वेक्षण झाले. त्यातून भारतात सातशेहून अधिक भाषा आणि बोली असल्याचे आढळून आले. यातील काही फारच कमी बोलल्या जातात तर काही कोट्यवधी लोक बोलतात. दुसऱ्या भारतीय भाषांमध्ये हिंदीने संपर्क भाषा म्हणून काम केले आहे. सध्याचा सत्ताधारी पक्ष एक धर्म, एक संस्कृती, एक भाषा यावर विश्वास ठेवतो; पण मुळात हे युरोपीय राष्ट्रांचे धोरण आहे. त्यांची नक्कल करण्याचा हा प्रयत्न आहे.

हिंदी सर्वाधिक बोलली जाते. त्यामुळे हे धोरण असेल का?
हिंदीभाषिक प्रदेश सर्वांत हिंसक, धर्मांध, कायद्यांची मोडतोड करणारा आहे, असा निष्कर्ष त्या प्रदेशांमधील गेल्या काही वर्षांचा राजकीय व्यवहार बघून काढता येतो. हिंदी ही जातीयवाद, हिंसा, हत्या, बलात्काराची भाषा आहे, हा निष्कर्ष काही प्रमाणात सत्यही आहे; पण हिंदी साहित्यात त्याचे समर्थन मिळणार नाही. आपल्या देशातील राजकारणाचे खूपच बाजारीकरण झाले आहे; पण त्यात आंतर्विरोधही आहे. प्रचार, प्रसार आणि मते मागण्याची वेळ येते, तेव्हा त्यांना बहुभाषिकतेचा अभिमान वाटतो आणि नंतर याच प्रादेशिक भाषांचे महत्त्व ते नाकारतात. हिंदीने संपर्क भाषा म्हणून काम करताना आपली दुसरी बाजूही सांभाळून ठेवली आहे.

अनुवादाला हवी तशी प्रतिष्ठा मिळतेय का?
पश्चिमेत अनुवादाला जी प्रतिष्ठा मिळाली, ती भारतीय भाषांमध्ये मिळाली नाही. मात्र, भारतीय भाषांमध्ये आपसात अनुवादाचे काम वाढले आहे. मल्याळम, मराठी, हिंदी या इतर भाषांचे आतिथ्य करणाºया आहेत. यात दुसºया भाषांचे अनेक अनुवाद झाले. मात्र, बंगाली ही सर्वांत कमी आतिथ्यशील भाषा आहे. बंगालीत इतरांचे अनुवाद फारच कमी होतात. गुजरातीमध्ये बंगाली भाषेतून खूप अनुवाद झाले; पण गुजरातीचे बंगालीत कमी आहेत. हिंदीमध्ये तर बंगाली साहित्याचा अनुवाद मोठ्या प्रमाणात झाला. टागोर, महाश्वेतादेवी यांच्यासारखी कितीतरी नावे सांगता येतील. हिंदीत आतिथ्य आहे; पण उणीवही आहे. हिंदीभाषिक लोक दुसरी भारतीय भाषा फार कमी शिकतात. विशेषत: इतर भाषिक लोकच हिंदी शिकून त्याचा अनुवाद करतात.

संस्कृतचा योग्य वापर होतोय का?
संस्कृत, पाली, प्राकृत या अभिजात भाषा आहेत. त्यांचे ज्ञान असलेले खूप कमी लोक भारतात आहेत. या भाषांच्या बाबतीत विद्वत्तेच्या अभावाचे मोठे संकट आहे. या भाषांचे सर्वांत विश्वसनीय स्रोत हळूहळू कमी होत आहेत; पण विदेशात जास्त प्रमाणात आहेत. मात्र, आधुनिक राष्ट्रीय भाषांचे महत्त्व कमी करून त्यांचे महत्त्व वाढविणे योग्य नाही. संस्कृतला स्तुती, अंधभक्ती, चापलुसीची भाषा बनविले जात आहे. ते अज्ञानी आहेत किंवा संस्कृतमधील निर्भयतेचे स्वीकार करू इच्छित नाहीत. संस्कृतमध्ये जेवढी निर्भयता, जिज्ञासा, ज्ञानाच्या विविधतेचा स्वीकार आहे तो अनेक भाषांमध्ये नाही. वेद वैदिक संस्कृतमध्ये लिहिण्यात आले. संस्कृतची बौद्धिक परंपरा ही शास्त्रार्थाची होती. नवा विचार मांडण्यासाठी तुम्हाला इतिहास सांगावा लागतो. त्यानंतरच नवी विचारसरणी आणावी लागते. तिला चरणस्पर्शी भाषा करणे हा अन्याय आहे.


Web Title: Marathi is not a regional but a national language - Ashok Vajpayee
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.