घरातून ओढून नेलं अन् गळा... माओवाद्यांकडून भाजप नेत्याची हत्या! पोलिसांचा खबरी असल्याचा आरोप
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 11, 2024 18:34 IST2024-12-11T18:33:12+5:302024-12-11T18:34:05+5:30
या भाजप नेत्यावर माओवाद्यांनी पोलिसांचा खबरी असल्याचा आरोप केला होता. यासंदर्भात पोलिसांनी बुधवारी माहिती दिली.

घरातून ओढून नेलं अन् गळा... माओवाद्यांकडून भाजप नेत्याची हत्या! पोलिसांचा खबरी असल्याचा आरोप
छत्तीसगडमध्ये माओवाद्यांची दहशत दिवसेंदिवस वाढत आहे. येथील बिजापूर जिल्ह्यात मंगळवारी रात्री माओवाद्यांनी एका भाजपच्या नेत्याची कथितरित्या हत्या केल्याची घटना घडली. या भाजप नेत्यावर माओवाद्यांनी पोलिसांचा खबरी असल्याचा आरोप केला होता. यासंदर्भात पोलिसांनी बुधवारी माहिती दिली.
पोलिसांच्या म्हणण्यानुसार, माओवाद्यांनी ३५ वर्षीय कुडियाम माडो यांना त्यांच्या राहत्या घरातून ओढून नेले आणि त्यांचा गळा दाबून हत्या केली. कुडियाम माडो हे भाजपच्या शेतकरी संघटनेच्या भारतीय जनता किसान मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष होते. तसेच, घटनास्थळावरून प्रतिबंधित सीपीआयच्या (माओवादी) बिजापूर नॅशनल पार्क एरिया कमिटीने जारी केलेले पॅम्प्लेट देखील जप्त केले आहेत, ज्यामध्ये माओवाद्यांनी कुडियाम माडो यांना पोलिसांचा खबरी असल्याचे म्हटले आहे, असे पोलिसांनी सांगितले.
स्थानिक फरसेगड पोलिसांनी कुडियाम माडो यांचा मृतदेह ताब्यात घेतला असून पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे. दरम्यान, रमणसिंग यांच्या मंत्रिमंडळातील माजी मंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते महेश गगडा यांनीही या वृत्ताला दुजोरा दिला असून या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी झाली पाहिजे, कारण बस्तरमध्ये मारले गेलेले बहुतांश भाजप नेते बिजापूरचे आहेत, असे महेश गगडा यांनी म्हटले आहे.
या घटनेसह, या वर्षात आतापर्यंत बस्तर विभागात वेगवेगळ्या ठिकाणी माओवाद्यांच्या हिंसाचारात ६० हून अधिक लोक मारले गेले आहेत. जानेवारी २०२३ ते एप्रिल २०२४ दरम्यान विभागात वेगवेगळ्या घटनांमध्ये ९ भाजप नेत्यांची हत्या करण्यात आली. नुकतीच माओवाद्यांनी बिजापूरमध्येच एका अंगणवाडी सहायकाची हत्या केली होती. हत्येनंतर मृतदेह घरात टाकून ते घटनास्थळावरून फरार झाले होते. या घटनेनंतर संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण आहे.