माओवाद्यांनी घडविला ‘अग्निपथ’विराेधी हिंसाचार; एका नेत्याला बिहारमधून केली अटक
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 7, 2022 07:33 IST2022-08-07T07:33:40+5:302022-08-07T07:33:46+5:30
हिंसाचारासाठी चिथावणी दिल्याचे तपासात उघड

माओवाद्यांनी घडविला ‘अग्निपथ’विराेधी हिंसाचार; एका नेत्याला बिहारमधून केली अटक
पाटणा : अग्निपथ योजनेच्या विरोधात बिहारात झालेल्या हिंसाचारामागे माओवाद्यांचा हात असल्याचा दावा बिहार पोलिसांनी केला आहे. एका वरिष्ठ माओवादी नेत्यास अटक केल्यानंतर ही माहिती समोर आल्याचे पोलिसांनी म्हटले आहे. अग्निपथ योजनेच्या निषेधार्थ जूनमध्ये झालेल्या आंदोलनात लखिसराय येथे एक रेल्वे जाळण्यात आली होती. याप्रकरणी माओवादी नेता मनश्याम दास यास नुकतीच अटक करण्यात आली. त्याने पोलिसांना सांगितले की, आपल्या सहानुभूतदारांच्या मदतीने आपण रेल्वे जाळली होती. एका गटाने आंदोलकांना हिंसाचारासाठी चिथावणी दिल्याचेही त्याने पोलिसांसमोर कबूल केले.
तेलंगणा पोलिसांकडून मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे मनश्याम दास यास लखिसरायमधून अटक करण्यात आली होती. काही दिवसांपूर्वी भाड्याने घेतलेल्या एका घरातून तो आपल्या कारवाया करीत होता. त्याचा बिहार, झारखंड, पश्चिम बंगाल आणि तेलंगणा येथील नक्षली संघटनांशी थेट संपर्क होता. त्याच्या खोलीतून माओवादी साहित्य जप्त करण्यात आले आहे. माओवादी नेत्यांना भेटण्यासाठी तो जंगलात जात असे. तसेच त्याचे शहरातील सुमारे अर्धा डझन नेत्यांशी संबंध असल्याचेही तपासात आढळून आले आहे. पोलिसांनी सांगितले की, भागलपूर येथील विद्यापीठातील एका प्राध्यापकाचा नक्षलवाद्यांशी संबंध असल्याचे तपासात आढळले आहे. प्राध्यापकाने हा आरोप फेटाळला.
अग्निपथ योजनेविरुद्ध आजपासून मोहीम
अग्निपथ योजनेविरुद्ध संयुक्त किसान मोर्चा रविवारी एक राष्ट्रीय मोहीम सुरु करणार आहे. निवृत्त सैन्य कर्मचाऱ्यांचा युनायटेड फ्रंट आणि विविध युवा संघटनांच्या सहकार्याने ही मोहीम सुरु करण्यात येणार आहे. स्वराज्य इंडियाचे अध्यक्ष योगेंद्र यादव यांनी शनिवारी सांगितले की, ७ ते १४ ऑगस्ट या काळात जय जवान, जय किसान संमेलन आयोजित करण्यात येणार आहे. अग्निपथ योजनेचे विनाशकारी परिणाम लोकांना सांगणे, हे या मोहिमेचे लक्ष्य आहे. शांततेच्या मार्गाने आपले मत मांडत ही योजना मागे घेण्यासाठी केंद्रावर दबाव टाकणे, हा यामागचा उद्देश आहे. आमचे शेतकरी आणि सैनिक संकटात असतील तर आमचा पाठीचा कणा तुटण्याचा धोका आहे. या अभियानांतर्गत विविध ठिकाणी रविवारी कार्यक्रम होतील.
रेल्वेचे सर्वाधिक नुकसान
‘अग्निपथ’विराेधी आंदाेलनामध्ये रेल्वेचे सर्वाधिक नुकसान झाले. देशभरात सुमारे २५० काेटींहून अधिक रुपयांच्या मालमत्तेचे नुकसान झाले. ९०० हून अधिक प्रवासी रेल्वेगाड्या रद्द करण्यात आल्या हाेत्या. तर ५ लाखांहून अधिक तिकिटे रद्द करावी लागली हाेती.