‘भगवद्गीता’ची हस्तलिखितांचा युनेस्कोच्या ‘जागतिक स्मृती रजिस्टर’मध्ये समावेश
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 19, 2025 06:19 IST2025-04-19T06:17:39+5:302025-04-19T06:19:24+5:30
युनेस्कोने १७ एप्रिल रोजी आपल्या विश्व स्मृती रजिस्टरमध्ये ७४ नवीन दस्तावेजी संग्रह समाविष्ट केले आहेत.

‘भगवद्गीता’ची हस्तलिखितांचा युनेस्कोच्या ‘जागतिक स्मृती रजिस्टर’मध्ये समावेश
नवी दिल्ली : ‘भगवद्गीता’ आणि भरत मुनींच्या ‘नाट्यशास्त्रा’च्या हस्तलिखितांसह ७४ दस्तावेजांचा युनेस्कोच्या ‘जागतिक स्मृती रजिस्टर’मध्ये समावेश करण्यात आला आहे.
युनेस्कोने दिलेल्या माहितीनुसार, ७२ देशांतील व चार आंतरराष्ट्रीय संघटनांच्या वैज्ञानिक क्रांती, इतिहासात महिलांचे योगदान व बहुपक्षवादाच्या प्रमुख उपलब्धींवर नवीन दस्तावेजांचा समावेश करण्यात आला आहे.
या रजिस्टरमध्ये दस्तावेजी वारशाच्या रूपात पुस्तके, हस्तलिखिते, मानचित्र, छायाचित्रे, ध्वनी किंवा व्हिडीओ रेकॉर्डिंगचा समावेश आहे. नाट्यशास्त्र हा कलांवरील एक मौलिक ग्रंथ मानला जातो.
युनेस्कोने १७ एप्रिल रोजी आपल्या विश्व स्मृती रजिस्टरमध्ये ७४ नवीन दस्तावेजी संग्रह समाविष्ट केले आहेत. आता याची एकूण संख्या ५७० झाली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, केंद्रीय संस्कृती मंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांनी हा भारतासाठी ऐतिहासिक क्षण असल्याचे म्हटले आहे.
काय आहे ‘स्मृती रजिस्टर’?
युनेस्कोने १९९२मध्ये पुढील पिढीसाठी दस्तावेज सुरक्षित ठेवण्यासाठी हा उपक्रम सुरू केला. जगातील जुन्या, महत्त्वपूर्ण व ऐतिहासिक दस्तावेजांची जपवणूक करणे हा याचा मुख्य उद्देश आहे. लोकांना संबंधित दस्तावेज सहजपणे पाहता येतो. शेकडो वर्षे जुने दस्तावेज संरक्षित केले जातात.
हा प्रत्येक भारतीयासाठी अभिमानाचा क्षण आहे. आमचे शाश्वत ज्ञान व समृद्ध संस्कृतीला मिळालेली ही जागतिक मान्यता आहे. गीता व नाट्यशास्त्राने सभ्यता व चेतना समृद्ध केल्या आहेत. -नरेंद्र मोदी, पंतप्रधान