Mansa Devi Temple Stampede Haridwar: अचानक गर्दी वाढली... रेटारेटी सुरू झाली; जिन्यावर इतके भाविका आले की, मुंगीलाही वाट मिळणार नाही. गर्दीत लोकांना गुदमरायला लागलं आणि त्याचवेळी एक अफवा उठली. विजेची तार तुटलीये आणि जिन्यामध्ये करंट पसरलं आहे. त्यानंतर एकच गोंधळ झाला आणि दर्शनासाठी आलेल्या आठ जणांवर मृत्यूने देवीच्या दारातच झडप घातली. यात अनेक भाविक जखमी झाले. या घटनेचे अनेक व्हिडीओ आता समोर आले आहेत.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
उत्तराखंडमधील हरिद्वारमध्ये असलेल्या प्रसिद्ध मनसा देवी मंदिरात रविवारी चेंगराचेंगरीची दुर्दैवी घटना घडली. रविवारी सकाळी मंदिरात दर्शनासाठी अचानक भाविकांची मोठी गर्दी झाली.
पायऱ्यांवर रांगा लागल्या. सुट्टी असल्याने भाविकांची प्रचंड गर्दी वाढली. खालून येणारे भाविक पुढे ढकलू लागले, तर समोर असलेल्या भाविकांकडून रेटारेटी सुरू झाली. ही गर्दी इतकी होती की, काही भाविक अक्षरशः दबू लागले होते. त्यानंतर काही क्षणातच चेंगराचेंगरी झाली.
मनसा देवी मंदिर चेंगराचेंगरी पूर्वीचा हा व्हिडीओ बघा
विद्युत प्रवाह जिन्यात उतरल्याची अफवा अन्...
काही प्रत्यक्षदर्शींनी सांगितले की, भाविकांची गर्दी प्रचंड होती. पण, अफवा उडाल्यामुळे गोंधळ उडाला आणि लोक जीव वाचवण्यासाठी पळायला लागले. मंदिराच्या परिसरात विजेची तार तुटली आहे आणि त्यामुळे जिन्यामध्ये विद्युत प्रवाह उतरल्याची अफवा उडाली. त्यामुळे भाविक सैरभैर पळायला लागले. यात काही जण पायाखाली येऊन जखमी झाले. तर ८ जणांचा मृत्यू झाला.
मनसा देवी मंदिर चेंगराचेंगरीनंतरचे भयावह दृश्य
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सकाळी ९ वाजेच्या सुमारास ही घटना घडली. माहिती मिळताच प्रशासकीय आणि पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. तातडीने मदत कार्य सुरू करण्यात आले. मृत भाविकांमध्ये इतर राज्यातील भाविकांचा समावेश आहे.
जिन्यामध्ये विद्युत प्रवाह उतरल्याची माहिती गढवालचे पोलीस आयुक्त विनय कुमार यांनी फेटाळून लावली. या प्रकरणाचा तपास केला जात आहे. या घटनेत ३० पेक्षा अधिक भाविक जखमी झाले आहेत. या घटनेबद्दल राष्ट्रपदी द्रौपदी मुर्मू, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केला.