अमेरिकेशी मैत्रीमध्ये सिंग यांची महत्त्वाची भूमिका : बायडेन
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 29, 2024 07:08 IST2024-12-29T07:07:57+5:302024-12-29T07:08:32+5:30
माजी पंतप्रधान मनमोहनसिंग यांचे पार्थिव शनिवारी सकाळी काँग्रेसच्या दिल्लीतील मुख्यालयात अंतिम दर्शनासाठी ठेवण्यात आले होते.

अमेरिकेशी मैत्रीमध्ये सिंग यांची महत्त्वाची भूमिका : बायडेन
नवी दिल्ली : माजी पंतप्रधान मनमोहनसिंग यांच्या पार्थिवावर दिल्ली येथील निगमबोध घाट येथे शासकीय इतमामात शनिवारी अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधान, गृहमंत्री, लोकसभेतील विरोधी पक्षनेते आदी नेत्यांनी त्यांना आदरांजली वाहिली. देशभरातून आलेल्या असंख्य काँग्रेस कार्यकर्त्यांनी सिंग यांना शनिवारी अखेरचा निरोप दिला.
माजी पंतप्रधान मनमोहनसिंग यांचे पार्थिव शनिवारी सकाळी काँग्रेसच्या दिल्लीतील मुख्यालयात अंतिम दर्शनासाठी ठेवण्यात आले होते. तिथे असंख्य काँग्रेस कार्यकर्ते आणि नेत्यांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली. त्यानंतर, फुलांनी सजविलेल्या लष्करी ट्रकवर राष्ट्रध्वजात गुंडाळलेले मनमोहनसिंग यांचे पार्थिव ठेवण्यात आले. त्या ट्रकमध्ये माजी पंतप्रधानांच्या कुटुंबीयांसमवेत लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधीही होते. काँग्रेस मुख्यालयातून निघालेली मनमोहनसिंग यांची अंत्ययात्रा निगमबोध घाटावर सकाळी साडेअकरा वाजता पोहोचली. तिथे नेते व विविध देशांतून आलेल्या मान्यवरांनी त्यांचे अंत्यदर्शन घेतले.
मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली म्हणून मॉरीशसने राष्ट्रध्वज अर्ध्यावर उतरवला. सूर्यास्तापर्यंत सर्व सरकारी कार्यालये व संस्थांवरील राष्ट्रध्वज अर्ध्यावर फडकत होते. मॉरीशसचे पंतप्रधान नवीन रामगुलाम यांनी या निर्णयाची घोषणा केली.
सॅन फ्रान्सिस्को : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी भारताचे माजी पंतप्रधान मनमोहनसिंग यांच्या निधनाबद्दल तीव्र शोक व्यक्त केला असून, सिंग यांनी भारत-अमेरिका संबंध मजबूत करण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली, असे प्रशंसोद्गार काढले आहेत.
राष्ट्राध्यक्ष जो बायडेन आणि त्यांच्या पत्नी जिल बायडेन यांनी जारी केलेल्या संयुक्त निवेदनात म्हटले आहे की, मनमोहनसिंग हे खरे मुत्सद्दी आणि दृष्टे नेते होते. त्यांची रणनीतिक दूरदृष्टी आणि राजकीय धैर्य यांशिवाय भारत-अमेरिका यांच्यातील संबंध अभूतपूर्व उंचीवर जाणे शक्यच नव्हते. नागरी अणुकरारापासून भारत-प्रशांत क्षेत्रातील क्वाडच्या प्रारंभापर्यंत विविध करार आणि सहयोग त्यांच्यामुळेच प्रत्यक्षात येऊ शकले. त्यांनी तयार केलेल्या रूपरेखेमुळे आमची राष्ट्रे आणि विश्व यांना आगामी पिढ्यांसाठी मजबूत बनवले आहे.
कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांनी सांगितले की, मनमोहनसिंग यांच्या निधनामुळे भारताची तसेच जगाची मोठी हानी झाली आहे.
अणुकरारामुळे संबंध नव्या पातळीवर : राइस
अमेरिकेच्या माजी परराष्ट्रमंत्री कोंडोलिझा राइस यांनी ‘एक्स’वरील पोस्टमध्ये म्हटले की, मनमोहनसिंग यांच्या निधनाच्या वृत्ताने मला खूप दु:ख झाले आहे. ते महान व्यक्ती आणि महान नेता होते. २००८ मध्ये त्यांनी नागरी अणुकराराच्या माध्यमातून भारत आणि अमेरिका यांच्यातील द्विपक्षीय संबंध नव्या पातळीवर नेले.
अर्थव्यवस्था बंधमुक्त केली : गीता गोपीनाथ
आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या पहिल्या उपव्यवस्थापकीय संचालक गीता गोपीनाथ यांनी ‘एक्स’वर लिहिले की, मनमोहनसिंग यांनी १९९१च्या अर्थसंकल्पात भारतीय अर्थव्यवस्थेला बंधमुक्त केले. तसेच कोट्यवधी भारतीयांच्या आर्थिक विकासाला महत्त्वपूर्ण गती दिली. त्यांच्या सुधारणांमुळे असंख्य तरुण अर्थशास्त्रज्ञांना प्रेरणा दिली.