"बंगाल, बिहारमध्येही महिलांवर अत्याचार झाले, पण त्याची तुलना मणिपूरशी करणं योग्य आहे का?"
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 23, 2023 16:39 IST2023-07-23T16:39:09+5:302023-07-23T16:39:54+5:30
काँग्रेसच्या चिदंबरम यांचा भाजपा आणि पंतप्रधान मोदींना सवाल

"बंगाल, बिहारमध्येही महिलांवर अत्याचार झाले, पण त्याची तुलना मणिपूरशी करणं योग्य आहे का?"
Manipur Violence P Chidambaram: संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी मणिपूरमध्ये एका नग्न महिलेची परेड केल्याचं प्रकरण चर्चेत आलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले होते की, मनात वेदना आणि राग दोन्ही आहे. कोणताही सुसंस्कृत समाज अशा घटना सहन करू शकत नाही. यासोबतच ते म्हणाले होते की, राजस्थान, छत्तीसगड, झारखंड किंवा मणिपूरचे असो, या घटनांना आळा घालायचा आहे. मणिपूरच्या दोषींना सोडले जाणार नाही. पंतप्रधानांच्या या वाक्यावर काँग्रेस नेते आणि देशाचे माजी केंद्रीय मंत्री पी चिंदबरम यांनी आक्षेप घेतला. राजस्थान आणि छत्तीसगड आणि मणिपूर एकत्र बोलून पंतप्रधान नक्की काय सुचवू पाहत आहेत. बिहार, पश्चिम बंगाल आणि राजस्थानमध्ये महिलांवरील हिंसाचार झाल्याचे मान्य केले तरी या राज्यांच्या घटनांची तुलना मणिपूर प्रकरणाशी होऊच शकत नाही.
केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांच्यावर साधला निशाणा
पी चिदंबरम यांची ही टिप्पणी केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांच्या विधानानंतर आली. अनुराग ठाकूर म्हणाले होते की, काँग्रेस शासित राज्यांमध्येही महिलांविरोधात गंभीर गुन्हे घडले आहेत. मणिपूरच्या मुद्द्यावर काँग्रेसचे नेते राजकारण करत आहेत, ही वेगळी बाब आहे. अनुराग ठाकूर यांनी पत्रकार परिषदेत सांगितले होते की, राजस्थानमध्ये गेल्या चार वर्षांत महिलांविरोधातील गुन्ह्यांची संख्या वाढली आहे. सुमारे एक लाख गुन्हे दाखल झाले. त्यातील सुमारे 33 हजार प्रकरणे महिलांवरील लैंगिक छळाशी संबंधित आहेत.
चिदंबरम यांनी दिलं उत्तर
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी चिदंबरम म्हणाले की, मणिपूरमधील परिस्थितीची बिहार, पश्चिम बंगाल आणि राजस्थानशी तुलना कशी करता येईल. या राज्यांमध्ये महिलांवर अत्याचार झाले हे मान्य करू पण त्याची तुलना मणिपूरशी करणं शक्य नाही. घाटी भागात कुकीज शिल्लक आहेत का? चुराचंदपूरमध्ये मेईतेई समुदायातील कोणी आहे का? जर अहवाल बरोबर असतील तर मणिपूरमध्ये जातीय शुद्धीकरण मोहीम पूर्ण झाली आहे, अशी रोखठोक मतही त्यांनी मांडले.